उच्चशिक्षीत विद्यार्थी काढणार ‘मातोश्री’वर मोर्चा

0
अहमदनगर : राज्यातील उच्च शिक्षित विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यावर मोर्चा काढणार आहेत. विविध जिल्ह्यांतून हे विद्यार्थी २ डिसेंबर रोजी पायी मुंबईकडे निघणार आहेत. मुंबईत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याचे विद्यार्थ्यांचे नियोजन आहे. शिक्षणातील सुलभीकरण आणि त्यानंतर नोकरी व्यावसायासंबंधीच्या सुविधा याविषयीच्या मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.

या मागण्यांसाठी २० नोव्हेंबरला एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. मात्र, त्याची दखल घेतली नसल्याने आता मातोश्रीवर पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. एक डिसेंबरलाच हा मोर्चा निघणार होता, मात्र या दिवशी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान असल्याने तो एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे, स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेचे राज्य समन्वयक यशवंत तोडमल यांनी सांगितले.

सुरक्षेच्या कारणास्तव महिलांना पायी मोर्चात येता येणार नाही. ज्या दिवशी भेट मिळेल, त्या दिवशी त्या वाहनाने मुंबईत येणार आहेत. विद्यार्थी मात्र, पायी जाणार आहेत. पहिल्या दिवशी घरून डबा घेऊन जाणार असून त्यानंतर वाटेत गावोगावी थांबून लोकांना आपल्या प्रश्नांची माहिती देत पुढे वाटचाल करणार आहेत. आर्थिक पाठबळ नसल्याने वाटेत गावकऱ्यांनीच आंदोलकांची जेवणाची व्यवस्था करावी, अशी त्यांची अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.