नवी दिल्ली : अलीकडच्या काळात रोख रकमेऐवजी ऑनलाईन किंवा कार्ड पेमेंट करण्याची पद्धत वापरतात आहे. बॅंकेतून रोख काढण्याच्या दगदगीला टाळण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी लोक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट करतात. त्यामुळे आता लोकांच्या खिशात कॅशऐवजी क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड असते. कार्ड वापराच्या सुविधा नक्कीच आहेत. मात्र त्याचबरोबर कार्डशीसंबंधित फ्रॉडचेही प्रमाण वाढत चालले आहे.
अनेकवेळा अशा बातम्या असतात कि अमुक व्यक्तीने एटीएममधून पैसे काढले आणि काही वेळातच त्याच्या खात्यातून उर्वरित रक्कम गायब झाली. त्या व्यक्तीने सर्व सावधगिरी घेतलेली असूनही पैसे गायब झालेले असतात.
प्रत्यक्षात तो माणून एका फ्रॉडचा शिकार झालेला असतो. हल्ली कार्ड स्कीमिंग आणि क्लोनिंग याच्याशी निगडीत गुन्हे मोठ्या प्रमाणात होत आहेत. कार्डद्वारे होणाऱ्या फसवणुकींशी हे दोन्ही प्रकार जोडलेले आहेत. फ्रॉडपासून सुरक्षित राहण्यासाठी त्यांचे प्रकार समजून घेतले पाहिजेत.
कार्ड स्कीमिंग –
हे फ्रॉड कार्ड स्वॅपिंगच्या वेळेस होतात. काही दुकानदार चलाखी करत स्वाईप मशीनशी जोडलेल्या सिस्टममध्ये की लॉगर इन्स्टॉल करतात. जेव्हा ग्राहक बिल पे करण्यासाठी कार्ड स्वाईप करतो तेव्ही की लॉगर मशीनमध्ये त्याचा पासवर्ड आणि कार्डशी निगडीत माहिती सेव्ह होते. त्यानंतंर ऑनलाईन ट्रान्झॅक्शनद्वारे ग्राहकाच्या याच माहितीचा वापर करून त्याच्या खात्यामधून पैसे गायब केले जातात.
कार्ड क्लोनिंग –
कार्ड क्लोनिंग म्हणजे डुप्लिकेट कार्ड. काही वेळा डेबिट कार्ड स्वाईप करण्यादरम्यान कार्डची मॅग्नेटिक स्ट्रिपवर असलेली सर्व माहिती दुसऱ्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये फीड होतो. हे सर्व होते कार्ड मशीन मध्ये स्कीमर डिव्हाईस लावलेले असल्यामुळे. यानंतर प्रिंटरद्वारे क्लोन कार्ड म्हणजेच कॉपीची प्रिंट घेतली जाते. ती जवळपास ओरिजिनल कार्डसारखीच असते.
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डशी निगडीत फ्रॉडपासून सुरक्षित राहण्याच्या टिप्स-
अनेकवेळा लोकांना बनावट कॉल येतात, ज्यामध्ये समोरची व्यक्ती स्वत:ला बॅंकेची मॅनेजर म्हणवते, तुमच्या खात्याला सुरक्षित करण्याचे सांगते आणि त्यासाठी तुमच्या कार्डचा पिन विचारते. या पद्धतीने कधीही पिन शेअर करू नका
कधीही आपल्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डची माहिती कोणालाही देऊ नका. कार्डवर पासवर्ड लिहू नका.
कधी कधी एटीएम मशीनमध्ये स्किमर डिव्हाईस लावलेले असतात. त्याचा वापर करून कार्डची माहिती कॉपी केली जाते. पैसे काढताना स्वॅपिंग एरियावर हात फिरवून तिथे एखादे स्किमर तर नाही ना याची खात्री करून घ्या. की पॅडचा एक कोपरा दाबून बघा, जर की पॅडला स्किमर लावलेले असेल तर त्याचा एक कोपरा बाहेर येईल.
हल्ली अनेक फिशिंग वेबसाईट आल्या आहेत. त्या कमी किंमतीत सामान विकण्याचा दावा करतात. स्वस्तात सामान विकत घेण्याच्या मोहात अनेकजण त्याला बळी पडतात.
कोणत्याही वेबसाईटवर शॉपिंग करण्यापूर्वी त्याला एकदा गुगल सर्च करा आणि पेमेंटसाठी कॅश ऑन डिलिव्हरीचाच पर्याय निवडा.
हॉटेल, पेट्रोल पंप, दुकान यासारख्या ठिकाणी कार्ड क्लोनिंगची प्रकरणे जोरात असतात. अशा ठिकाणी सावधगिरी बाळगा.
क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करताना कार्डवरील सीव्हीव्ही नंबर दिसणार नाही याची काळजी घ्या.
फ्रॉडचा शिकार झाल्यास 9212500888 या क्रमांकावर संपर्क करू शकता. त्यासाठी फोनवर ‘Problem’टाईप करा आणि या नंबरवर पाठवून द्या. सोबतच तुमचे कार्ड ब्लॉक करा. लक्षात ठेवा फ्रॉडची तक्रार तीन दिवसांच्या आत नोंदवली पाहिजे.