मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामध्ये कोणतीही तुलना करण्याची गरज नाही. दोघेही आमच्यासाठी आदरणीयच आहेत. त्यामुळे दोघांपैकी कोणीही मुख्यमंत्री झाला तरी आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, असे म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.
खासदार अमोल कोल्हे यांनी खासदार उदयनराजेंना भेटून शिवपुत्र संभाजी महानाट्याचे आमंत्रण दिले. या भेटीचेही नाना अर्थ काढू नका. कलावंत छत्रपतींच्या वंशजाना भेटलाय, त्यात राजकारण नाही, हे सांगयलाही ते विसरले नाहीत.
सांगलीतील कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने खासदारकी कोण लढणार, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मी बोललो होतो. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये कोणतीही तुलना करण्याची गरज नाही. दोघेही आमच्यासाठी आदरणीयच असल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले.
पक्षात आमचे नेते शरद पवार सर्व निर्णय घेत असतात. त्यामुळे दोघांपैकी कोणीही मुख्यमंत्री झाला तरी आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तर सध्याचे सरकार कधी कोसळेल, असे विचारले असता ते म्हणाले, या विषयावर बोलायला मी ज्योतिष नाही. तसेच याविषयी माझा अभ्यासही नाही, असेही कोल्हे यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे सांगली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील यांचे नाव घेतले. ते म्हणाले की, जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित व सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसजवळ जयंत पाटलांच्या ताकदीचा दुसरा उमेदवार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, आता कोल्हे यांनी हा शब्द फिरवत जयंत पाटील – अजित पवारांपैकी कोणीही मुख्यमंत्री झाला, तर आनंद असल्याचे म्हटले आहे.