औरंगाबाद : वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका वृत्तवाहीनीशी संवाद साधताना अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. अब्दुल सत्तार यांनी ‘इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही (खोके) देऊ’ असं म्हटलं. सत्तार यांनी थेट कॅमेऱ्यासमोरच वादग्रस्त विधान केलं आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी यासंदर्भात संताप व्यक्त केला आहे.
औरंगाबादमध्ये एका मराठी वृत्तवाहीनीच्या प्रतिनिधीशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणून तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं आहे. यावर काय सांगाल असं सत्तार यांना विचारण्यात आले. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकरी उल्लेख करत त्यांना शिवी दिली. ‘इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ’ असं उत्तर सत्तार यांनी दिलं.
सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांच्या नावाने असलेल्या ट्विटर हॅण्डलवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या महिलाविरोधी नेत्यांकडून सुप्रियाबद्दल आणि पर्य़ायाने सर्व महिलांबद्दल वादग्रस्त विधाने सुरुच आहे. पुरुषार्थ सांगणारे हे लोक त्यांच्या वर्तवणुकीमुळे आणि क्षमतेमुळे उघडे पडले आहेत. असं सदानंद सुळे याच्या नावाने असलेल्या ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करण्यात आले आहे. हे अकाउंट व्हेरिफाईड नाही.
अब्दुल सत्तार यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. महाराष्ट्रील अनुभवी मंत्र्यानं घाणेरड्या पातळीवर जाऊन बोलणं चुकीचं आहे. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा काँग्रेस तर्फे निषेध करते. सत्तार यांनी या प्रकरणी माफी मागावी, असं काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.