नाशिक : जमिनीशी संबंधित गुन्ह्यांमध्ये भूमाफिया हे महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन जागामालकांचा छळ करत आहेत. जमीन हडपण्यासाठी भूमाफियांकडून विस्फोटक परिस्थिती निर्माण केली आहे. महसूल अधिकारी हे आरडीएक्स सारखे आहेत. तर कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकारी डिटोनेटरसारखे आहेत. आरडीएक्स आणि डिटोनेटर मिळून जिवंत बॉम्ब बनतो, जो भूमाफिया त्यांच्या मर्जीप्रमाणे वापरत असल्याचा गंभीर आरोप नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केला आहे. पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी महसूल विभागावर गंभीर आरोप केले आहेत.
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी महसूल अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील शहरीकरण, औद्योगिकरण, आधुनिकीकरणासाठी महसूल अधिकाऱ्यांकडील कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार काढून घेण्याची मागणी पोलीस आयुक्तांनी पोलीस महासंचालकांकडे पत्राद्वारे केली आहे.
भूमाफियांमुळे जागामालक हतबल व भयभीत झाले आहेत. इच्छा नसतानाही कमी दराने जागा विक्री करत आहेत किंवा भूमाफिया जागा बळकावत आहेत. महसूल विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन भूमाफिया हे काम करत आहेत. त्यामुळे महसूलचे अधिकार काढून घेतल्यास भूमाफियांवर अंकुश ठेवता येईल, असेही पांडे यांनी पत्रात म्हटले आहे.
नाशिक जिल्ह्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम, (1951) चे कलम 7 नुसार पोलीस आयुक्तालयाचा दर्जा देऊन फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 20(1) नुसार पोलीस आयुक्त यांना जिल्हा दंडाधिकारी म्हणून घोषित करण्याची विनंती पत्रात करण्यात आली आहे.