नाशिक : इगतपुरी येथील बहुचर्चित रेव्ह पार्टींतील अभिनेत्री हिना पांचाळसह सर्व संशयितांना जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. पी. नाईक- निंबाळकर यांच्या न्यायालयात बुधवारी (ता.७) हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या सर्वांची न्यायालयाने नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.
इगतपुरी येथील स्काय ताज व्हिला आणि स्काय लगून व्हिला या दोन खासगी बंगल्यांमध्ये शनिवारी (ता.२६ जून) ग्रामिण पोलिसांनी छापा टाकून अमली पदार्थांच्या नशेत असलेल्या महिला व पुरूषांना जेरबंद केले होते. या प्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात विभत्स वर्तन, विनापरवाना अंमली पदार्थ बाळगणे व त्याचे सामुहिकपणे सेवन करणे आणि कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन आदींसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इगतपुरी येथील न्यायालयाने हिना पांचाळ या अभिनेत्रीसह उर्वरीत संशयितांच्या पोलिस कोठडीत वाढ केली होती. त्या पाठोपाठ संशयितांना मंगळवारी (ता.६) अंमली पदार्थ विरोधी कायदा (एनडीपीएस) गुन्ह्यात येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने पुन्हा एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.
संशयितांची बुधवारी पोलिस कोठडी संपल्याने सगळ्यांना नाशिक येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. सुमारे तास भर दोन्ही पक्षांतर्फे जोरदार युक्तीवाद होउन न्यायालयाने संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे संशयीतांची नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.