डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग ठराव

0

वॉशिंग्टन : कॅपिटॉल इमारतीमध्ये झालेल्या हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप ठेवत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात डेमोक्रॅटिक पक्षांनी महाभियोगाचा ठराव लोकप्रतिनिधीगृहात दाखल केला आहे.

सभागृहाचे कामकाज सुरु होताच डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी राज्यघटनेतील २५ व्या घटनादुरुस्तीचा उपयोग करण्याची विनंती उपाध्यक्ष माइक पेन्स यांच्याकडे केली. मंत्रिमंडळातील बहुतांश सदस्यांची मान्यता असल्यास उपाध्यक्ष हे या घटनादुरुस्ती कलमाचा आधार घेत अध्यक्षांची थेटपणे हकालपट्टी करू शकतात.

मात्र, रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी या मागणीला विरोध केला. महाभियोगाचा ठराव मांडताना डेमोक्रॅटिक पक्षाने ट्रम्प यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. निवडणूक आपणच जिंकल्याची खोटी माहिती वारंवार जनतेला सांगणे, ६ जानेवारीला झालेल्या मतमोजणी आधी आपल्या समर्थकांसमोर चिथावणी देणारे भाषण करणे असे आरोप यामध्ये आहेत.

याशिवाय, जॉर्जियाच्या निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आणताना त्यांना ‘मते शोधून’ निवडणूक निकाल फिरविण्यास सांगण्याचाही उल्लेख ठरावात करण्यात आला आहे. ‘या सर्व प्रकरणांमध्ये अध्यक्ष ट्रम्प यांनी देशाच्या सुरक्षेला आणि घटनात्मक संस्थांना धोका निर्माण केला. त्यांनी लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण करताना शांततापूर्ण सत्तांतर प्रक्रियेतही अडथळे आणले. त्यांच्या या कृतींमुळे अध्यक्षपदाच्या विश्‍वासार्हतेला तडा गेला असून देशातील नागरिकांनाही धक्का बसला आहे,’ असे ठरावात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.