जोहान्सबर्ग : आफ्रिका खंडातील एका देशात पंतप्रधानांचाच करोनानं जीव घेतला आहे. इस्वाटिनी देशाचे पंतप्रधान एम्बोरोसे डलामिनी यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तब्बल महिनाभर त्यांनी करोनाशी झुंज दिली. अखेर त्यांचा हा लढा अपयशी ठरला.
५२ वर्षांचे एम्बोरोसे दालमिनी यांना चार आठवड्यांपूर्वीच करोनानं विळखा घातला होता. त्यांना चांगले उपचार मिळून त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी म्हणून त्यांना दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एक डिसेंबरपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.
नोव्हेंबर २०१८ मध्ये दालमिनी यांच इस्वाटिनीच्या पंतप्रधानपदी निवड झाली होती. त्यांनी बँकिंग क्षेत्रातही अठरा वर्षांपेक्षा अधिक काळ काम केलं आहे. इस्वाटिनी नेडबँक लिमिटेडमध्ये ते व्यवस्थापकीय संचालक होते. इस्वाटिनी हा दक्षिण आफ्रिकेतील छोटासा देश आहे. १.२ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील या देशात ६७६८ करोना रुग्ण आहेत. १२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.