मुंबई : गेल्या महिन्यात २५ तारखेला साेलापूरसह उस्मानाबाद, नाशिक आणि काेल्हापूर येथे आयकर अधिकाऱ्यांच्या पथकांनी २५ हून अधिक ठिकाणी छापे टाकले हाेते. त्याचा तपशील कथन करण्यासाठी आयकर विभागाने एक पत्रक काढले. त्यात धक्कादायक माहिती असून, सुमारे शंभर काेटींहून अधिक बेहिशेबी मालमत्ता आढळल्याचे म्हटले आहे.
चारही जिल्ह्यांतील तपासाचा केंद्रबिंदू साेलापूर शहर आणि पंढरपूर हाेते. तीन दिवस छापे मारून पथके माघारी गेली हाेती. त्यानंतर १५ दिवसांनी आयकर खात्याने त्याचा लेखाजाेखा मांडणारे हे पत्रक काढले आहे. वाळू उत्खनन, साखर कारखानदारी, वैद्यकीय महाविद्यालय, आराेग्य सेवा, रस्ते बांधकाम आदींचा उल्लेख करून त्यांच्या कारभारातील तफावत दर्शवणारी कागदपत्रे आणि राेकड जप्त केल्याचे पत्रकात नमूद आहे, परंतु संबंधितांची नावे नाहीत.
या शोधमोहिमेत हार्ड कॉपी दस्तऐवज आणि डिजिटल डेटाच्या रूपात मोठ्या प्रमाणात पुरावे सापडले. ते सगळे जप्त करण्यात आलेत. त्यावरून या व्यावसायिकांनी अवलंबलेल्या करचुकवेगिरीच्या विविध पद्धती उघड झाल्या. ज्यात बोगस खर्चाचे बुकिंग, अघोषित रोख विक्री, अस्पष्ट कर्ज, क्रेडिट यांच्या नोंदी आहेत.
वाळू उत्खनन आणि साखर उत्पादनात १५ कोटींपेक्षा जास्त बेहिशेबी रोख विक्रीचे कागदोपत्री पुरावे सापडले. बेहिशेबी उत्पन्न खातेवहीत असुरक्षित कर्जरूपात सादर केले. १० कोटींवर बेहिशेबी रोकड खातेवहीत वळवण्यात आल्याची कबुली समूहाच्या कर्जदात्यांनी, प्रवर्तकांनी दिली.
नॉन-फायलर कॉर्पोरेट कंपनीने मालमत्ता विकून सुमारे ४३ कोटी रुपये भांडवली नफा मिळवल्याचे पुरावेही जप्त केले. आरोग्यसेवा व वैद्यकीय महाविद्यालय चालवण्याच्या तसेच रस्ते बांधणीच्या व्यवसायात असलेल्या दुसऱ्या एका समूहामध्ये कॅपिटेशन फी दर्शवणाऱ्या अघोषित रोकड पावत्यांचे, डॉक्टरांना दिलेले वेतन व पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना दिलेले विद्यावेतन यांचा परतावा यांचे पुरावे आढळले.