पुणे : पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. मागील चोवीस तासात 55 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 2.6 टक्क्यांनी वाढला आहे. तर, मागील चोवीस तासात लोणावळा परिसरात 146 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.
पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. महापालिका सध्या धरणातून 510 एमएलडी पाणी उचलते. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत – पुनावळे दरम्यान असलेल्या बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो. यंदा उन्हाळा तीव्र होता. जून महिन्यात पाऊस पडला नाही. त्यामुळे पाणी कपातीचे संकट आले होते. परंतु, 1 जुलै पासून पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पाणीकपातीचे संकट टळले आहे.
पवना धरणातील परिस्थिती!
गेल्या 24 तासात झालेला पाऊस = 55 मि.मि.
1 जूनपासून झालेला पाऊस = 392 मि.मि.
गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 545 मि.मि.
धरणातील सध्याचा पाणीसाठा = 19.45 टक्के
गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = 34.28 टक्के
गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= 2.6 टक्के
1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = 2.6 टक्के