नवी दिल्ली : भारताने बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये 61 पदकांची कमाई केली. राष्ट्रकुल स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी देखील भारताने सुवर्ण पदकांचा पाऊस पाडला. भारताने 61 पदके जिंकत पदक तालिकेत चौथे स्थान पटकावले. यावेळी भारताने 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदके पटकावलीत.
भारताने एकूण 22 सुवर्ण 16 रौप्य 23 कांस्य पदक पटकावलीत. भारत पदक तालिकेत चौथ्या स्थानावर राहिला. विशेष म्हणजे भारत गेल्या सहा राष्ट्रकुल स्पर्धेत पदक तालिकेत पहिल्या पाचमध्ये आहे. गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल (2018) स्पर्धेत देखील भारत 66 पदकांसह चौथ्या स्थानावर होता.
राष्ट्रकुल स्पर्धेत आपण 1998 पासूनची कामगिरीचा आढावा घेतला तर आपल्याला दिसून येते की भारताने 2002 पासून आपल्या कामगिरीत सुधारणा केली आहे. भारताने 2010 मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंतची सर्वात दमदार कामगिरी केली होती. त्यावेळी भारताने 101 पदके मिळवत पदक तालिकेत दुसरे स्थान पटकावले होते. आपण 1998 पासून 2022 पर्यंतचा भारताच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरीचा आढावा घेऊ.
1998 क्वालालांपूर ( 25 पदके)
1998 मध्ये भारताने 7 सुवर्ण 10 रौप्य आणि 8 कांस्य पदक पटकावली होती. त्यावेळी भारत पदक तालिकेत सातव्या स्थानावर होता.
2002 मँचेस्टर (69 पदके)
मँचेस्टर राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने 30 सुवर्ण, 22 रौप्य आणि 17 कांस्य पदक पटकावली होती. या स्पर्धेत भारत पदक तालिकेत चौथ्या स्थानावर होता.
2006 मेलबर्न (50 पदके)
मेलबर्न येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने 22 सुवर्ण, 17 रौप्य आणि 11 कांस्य पदके पटकावली होती. यावेळी भारत पदक तालिकेत चौथ्या स्थानावर होता.
2010 दिल्ली ( 101 पदके)
दिल्लीत 2010 ला झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच पदकांचे शतक पार केले होते. भारताने या स्पर्धेत 38 सुवर्ण, 27 रौप्य, 36 कांस्य पदके पटकावली होती. भारत यावेळी पदक तालिकेत दुसऱ्या स्थानावर राहिला होता. ही भारताची राष्ट्रकुल स्पर्धांमधील आतापर्यंतची सर्वात दमदार कामगिरी होती.
2014 ग्लासगो (64 पदके)
ग्लासगोमध्ये 2014 साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण 64 पदके मिळवत पदक तालिकेत पाचवे स्थान पटकावले होते. यावेळी भारताने 15 सुवर्ण, 30 रौप्य आणि 19 कांस्य पदके पटकावली होती.
2018 गोल्ड कोस्ट ( 66 पदके)
गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण 66 पदके पटकावली होती. त्यावेळी भारत पदक तालिकेत तिसऱ्या स्थानावर राहिला होता. या स्पर्धेत भारताने 26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 कांस्य पदके पटकावली होती.
2022 बर्मिंगहम ( 61 पदके )
यंदाच्या बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण 61 पदके जिंकली. यावेळी भारताला निश्चित पदके जिंकून देणारा शुटिंग हा क्रीडा प्रकार समाविष्ट नव्हता. तरी भारताने 61 पदके जिंकत पदक तालिकेत चौथे स्थान पटकावले. यावेळी भारताने 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदके पटकावलीत.