सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि तुफानी ऋषभ पंत (८९*) यांच्या अर्धशतकी खेळींच्या बळावर भारतानं चौथ्या कसोटीत यश मिळवलं.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात ३३६ धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. भारतीय संघाने शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर ३२८ धावांचे कठीण आव्हान पार केलं.
सामन्याच्या शेवटच्या दिवशी रोहित लवकर बाद झाला. त्यानंतर शुबमन आणि पुजारा यांनी अर्धशतके झळकावली. गिल ९१ धावांवर बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणेही (२२) लवकर बाद झाला. पंत आणि पुजारा डाव सावरत असताना नवा चेंडू घेण्यात आला आणि पुजारा (५६) बाद झाला. पण पंतने खेळपट्टी सोडली नाही. शेवटपर्यंत नाबाद राहून त्याने ८९ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.
भारतीय संघाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही एक ट्विट केलं.
भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर शरद पवार म्हणाले, “दमदार अशा विजयासाठी टीम इंडियाचं खूप अभिनंदन! ही एक ऐतिहासिक घटना आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. गाबाच्या मैदानावर ३२ वर्षांनी ऑस्ट्रेलियन संघाला पराभवाचा सामना करायला भारतीय संघाने भाग पाडले. पुन्हा एकदा साऱ्यांचे अभिनंदन!”