सातारा : मदत करण्याचा बहाणा करुन एटीएम सेंटरमध्ये वैयक्तिक माहिती घेऊन, हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करून, पैसे काढणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला शिरवळ पोलिसांनी गजाआड केले आहे. या टोळीकडून ६२ एटीएम कार्ड जप्त केले आहेत. ही टोळी २०१२ पासून कार्यरत आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश राज्यांमध्ये धुमाकूळ घालत आहे. त्यांच्यावर महाराष्ट्रामध्ये २४ गुन्हे दाखल आहेत. ठाणे ग्रामीण येथील पडघा, सोलापूर येथील सांगोला, अहमदनगर येथील राहुरी, पिंपरी-चिंचवड येथील भोसरी पोलीस स्टेशन हद्दीमधील आठ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
प्रदीप साहेबराव पाटील (२९), किरण कचरू कोकणे (३५, दोघे रा. म्हारूळगाव, ता. कल्याण, जि. ठाणे), विकी राजू वानखेडे (२१, रा. भय्यासाहेब आंबेडकरनगर, उल्हासनगर), महेश पांडुरंग धनगर (३१, रा. ब्राह्मणपाडा, उल्हासनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भोंगवली (जि. पुणे) येथील नीलेश शिवाजी सुर्वे हे शिरवळ येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या एटीएममध्ये मित्रासमवेत रोकड काढण्यासाठी गेले होते. सुर्वे रक्कम काढत असताना पाठीमागे असलेले दोघे जण हळूच व्यवहार पाहत होते. रक्कम न निघाल्याने पावती पाहत असताना संबंधितांनी एटीएममधील कार्ड हातचलाखीने बदलले. काही वेळानंतर नीलेश सुर्वे यांच्या मोबाइलवर संदेशाद्वारे शिरवळ येथील एका बँकेच्या एटीएममधून तसेच वेळे, आसले येथील पेट्रोलपंपावरून खात्यामधील तब्बल ५० हजार ८१० रुपये काढल्याचे निदर्शनास आले. सुर्वे यांनी तात्काळ शिरवळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा व चोरीचा गुन्हा दखल केला.
घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे यांच्या पथकाने सीसीटीव्हींची पाहणी आणि गुन्हेगारांच्या चोरीच्या पद्धतीचा अभ्यास करीत ही टोळी उल्हासनगर, ठाणे येथील असल्याचे ओळखले. या टोळीतील गुन्हेगारांचा शोध घेता ते गोव्यावरून उल्हासनगरला कारमधून निघाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शिरवळ पोलिसांनी सापळा रचून ही कार पाठलाग करीत अडवून चौघांच्या मुसक्या आवळल्या.