नवी दिल्ली : ‘द बेटर इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, संजुक्ता पराशर यांचा जन्म आसाममध्ये झाला. आसाममध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्लीच्या इंद्रप्रस्थ महाविद्यालयातून राज्यशास्त्रात पदवी घेतली. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. यानंतर संजुक्ता यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात एमफिल आणि पीएचडी केली.
संजुक्ता पराशर यांनी अखिल भारतीय नागरी सेवा परीक्षेत ८५वा क्रमांक मिळवला होता आणि २००६ बॅचमधील त्या आयपीएस अधिकारी आहेत. यानंतर त्यांनी मेघालय-आसाम कॅडर निवडला.
२००८ मध्ये त्यांच्या पहिल्या पोस्टिंगदरम्यान, संजुक्ता यांची आसाममधल्या माकुल याठिकाणी सहाय्यक कमांडंड म्हणून नियुक्ती झाली. यानंतर त्यांना उदलगिरीमध्ये बोडो आणि बांगलादेशी यांच्यातील हिंसाचारावर नियंत्रण आणण्यासाठी पाठवण्यात आलं.
आसामच्या सोनितपूर जिल्ह्यात एसपी असताना संजुक्ता यांनी सीआरपीएफ जवानांच्या टीमचे नेतृत्व केले होते. एके ४७ हाताळत त्यांनी स्वत: बोडो अतिरेक्यांशी लढा दिला.
या ऑपरेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये त्या संपूर्ण टीमसोबत एके ४७ रायफल घेऊन जाताना दिसत होत्या. संजुक्ता यांना अनेकदा अतिरेकी संघटनांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. पण त्यांनी कधीच अशा धमक्यांची पर्वा केली नाही.
२०१५ साली संजुक्ता यांनी बोडोविरोधी दहशतवादी कारवाईचे नेतृत्व केले होते. त्यांनी केवळ १५ महिन्यांत १६ अतिरेक्यांना ठार केले होते.याशिवाय ६४ बोडो अतिरेक्यांना तुरुंगातही पाठवले होते. यासह, संजुक्ता यांच्या टीमने शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त केला होता. २०१४ मध्ये १७५ आणि २०१३ मध्ये १७२ दहशतवाद्यांना संजुक्ता यांच्या टीमने तुरुंगात पाठवले होते.