एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे एका महिना अगोदर माहित होते; अमित शहा यांनाही कल्पना होती
नितीन देशमुख यांचा दावा
मुंबई : एकनाथ शिंदे यांना तेच मुख्यमंत्री होणार हे बंडाच्या महिनाभर आधीच माहिती होते, सगळी सूत्रे दिल्लीतून हालत होती, त्यांनी स्वत मला हे सांगितले होते, असा दावा ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना केवळ सरकार पडणार एवढेच माहिती होते, त्यांना मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल कोणतीही माहिती नव्हती, असा दावाही त्यांनी केला आहे.
दरम्यान नितीन देशमुख पुढे बोलताना म्हणाले की, जी लोक मागे थांबून त्यांनी मातोश्रीवर चर्चा केली, हीच लोक खरी या बंडाची सूत्रधार होती. आम्हाला या सर्व गोष्टींची कुणकुण लागली होती. मात्र, उद्धव ठाकरेंना हे सांगायचे कसे आपण पहिल्यादा निवडून आलोय अशी आमच्या मनात भीती होती असे नितीन देशमुख यांनी म्हटले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या यूट्युब चॅनलवर आदेश बांदेकर यांनी सत्तांतर नाट्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांची मुलाखत घेतली त्यावेळी बोलत होते.
2019 मध्ये महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना व दोन्ही काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार आले होते. उद्धव ठाकरे सरकारने आपला अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. पण गतवर्षी तत्कालीन शहरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह बंडखोरी केली आणि ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदेंनी भाजपसोबत घरोबा करत सरकार स्थापन केले. ते स्वतः मुख्यमंत्री झाले.
पण या संपूर्ण घटनाक्रमात पडद्यामागे नेमके काय घडले? शिवसेनेचे आमदार सूरतला कसे पळाले? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे केव्हा ठरले? आदी अनेक प्रश्न महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहेत, ज्यांचे समर्पक उत्तर त्यांना आजतागायत मिळाले नाही. पण या सर्व प्रश्नांशी संबंधित एक मुलाखत सध्या राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचे आम्हाला बंडखोरीच्या महिनाभर अगोदरच समजले होते. कदाचित देवेंद्र फडणवीस यांना हे माहीत नसेल, पण एकनाथ शिंदे यांनी स्वतःच मला मी मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले होते. बंडखोरी होणार आणि सत्ता हस्तांतरित होणार हे फडणवीसांना माहीत होते. पण मुख्यमंत्री कोण होणार हे माहीत नव्हते, असे नितीन देशमुख म्हणाले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे केवळ शिंदे व केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना ठावूक होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मीच शिंदेंना मुख्यमंत्री केल्याचा दावा निखालस खोटा आहे. प्रत्यक्षात कोण मुख्यमंत्री होणार हे त्यांना ठावूकच नव्हते, असा दावा नितीन देशमुख यांनी या मुलाखतीत केला आहे.