पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या स्थानिक नेतृत्त्वावर नाराज होवून राष्ट्रवादी किंवा अन्य पक्षांच्या वाटेवर असलेल्या नाराजांना पक्षश्रेष्ठींनी सूचक संदेश दिला आहे. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या उमा खापरे यांना विधान परिषदेची उमेदवारी घोषित केली असून, नाराजांना बाहेर पडताना पुनर्विचार करावा लागेल, अशी स्थिती आहे.
राज्यात रिक्त होणाऱ्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक लागली आहे. त्यापैकी पाच उमेदवारांनी घोषणा भाजपाकडून करण्यात आली. यापैकी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
वास्तविक, उमा खापरे या भाजपा निष्ठावंत नेत्या आहेत. स्व. गोपिनाथ मुंडे समर्थक असलेल्या खापरे यांनी महापालिकेत दोन वेळा नगरसेवक म्हणून कार्यकाळ गाजवला आहे. २००१-०२ मध्ये खापरे महापालिकेत विरोधी पक्षनेत्या होत्या. मुंडे समर्थक, नगरसेविका, विरोधी पक्षनेत्या, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव, प्रदेशाध्यक्षा असा राजकीय आलेख खापरे यांनी यशस्वी केला आहे.
भाजपामध्ये असल्यास संधी मिळू शकते, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यास भाजपाचे प्रदेश नेतृत्व यशस्वी झाले आहे. यापूर्वी राज्यसभा खासदारपदी अमर साबळे, राज्य लोकलेखा समितीवर (राज्यमंत्री दर्जा) ॲड. सचिन पटवर्धन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळावर अमित गोरखे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सदाशीव खाडे, उपमहापौरपदी शैलजा मोरे, केशव घोळवे, सत्तारुढ पक्षनेतेपदी एकनाथ पवार, नामदेव ढाके, स्थायी समितीवर विलास मडिगेरी यांसह विविध समिती, प्रदेश कार्यकारिणीवर भाजपाच्या निष्ठावंतांना संधी देण्यात आली. आता त्यामध्ये उमा खापरे यांना संधी देत भाजपा पक्षश्रेष्ठींनी निष्ठावंत कार्यकर्ता हाच पक्षाचा केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट केले आहे.