काबुल स्फोटाचा हिशेब चुकता केला जाईल : जो बायडेन

0

अमेरिका : तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देशाबाहेर पडण्यासाठी लाखो नागरिकांची धडपड सुरू असताना गुरुवारी काबूल विमानतळ स्फोटांनी हादरले. विमानतळाबाहेर झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांत ६० जण ठार झाले असून, किमान १४० जण जखमी झाले. मृतांमध्ये १३ अमेरिकी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन चांगलेच संतपाल्याचं पहायला मिळत असून त्यांनी या हल्ल्याचा हिशेब चुकता केला जाईल असा इशारा दिलाय.

व्हाइट हाऊसमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना बायडेन यांनी इस्लामिक स्टेटशी संलग्न दहशतवादी संघटनांना थेट इशारा दिलाय. आम्ही हा हल्ला विसरणार नाही आणि यासाठी हल्लेखोरांना माफीही मिळणार नाही असं बायडेन म्हणाले आहेत. “ज्यांनी हे हल्ले घडवून आणलेत आणि ज्यांना अमेरिकेला त्रास देण्याची इच्छा आहे त्यांनी लक्षात ठेवावं की आम्ही तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्ही हा हल्ला विसरणारही नाही. आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि याचा हिशेब चुकता करु,” असं बायडेन म्हणालेत.

काबूलमधील हल्ल्यांनंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला काही वेळ मौन बाळगून मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच अमेरिकेचा राष्ट्रध्वज एका दिवसासाठी अर्ध्यावर उतरवण्यात आलाय. “हे कोणी घडवून आणलं आहे याचा अंदाज आपल्या सर्वांनाच आहे पण त्याबद्दल आपल्याला अद्याप खात्री नाहीय,” असं बायडेन यांनी हा हल्ला घडवून आणणाऱ्यांबद्दल बोलताना सांगितलं.

तसेच या हल्ल्यांनंतरही अमेरिकेकडून सुरु असणारी बचाव मोहीम सुरु राहणार असल्याचं बायडेन यांनी स्पष्ट केलं आहे. आम्ही सर्व अमेरिकन नागरिक, आम्हाला सहकार्य करणारे अफगाणिस्तानमधील आमच्या सहकाऱ्यांची सुखरुप सुटका केली जाईल, असं बायडेन म्हणालेत.

Leave A Reply

Your email address will not be published.