कोल्हापूरकरांचा उर भरुन आला; शहिदाच्या बहिणीकडे राखी बांधायला आमदार भाऊ आला!

बहिरेवाडी गावातील शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या बहिणीचे रक्षाबंधन

0
कोल्हापूर : बहीण- भावाच्या अतूट नात्याचे प्रतिक म्हणजे रक्षाबंधन. आमदार महेश लांडगे यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या बहिणीला बहीण मानले. देशबांधव म्हणून अलौकीक नाते जोडण्याचा प्रयत्न केला. भारत एकसंघ राहण्यासाठी आपले जवान सीमेवर पाय रोवून उभे आहेत. आजचा हा क्षण संस्मरणीय राहील. देशरक्षणासाठी जाज्ज्वल्य प्ररेणा तेवत राहील. आम्हा कोल्हापूरकरांचा उर भरून आला, अशा भावना सांगली- कोल्हापूर जिल्हा आजी- माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात बहिरेवाडी नावाचे गाव आहे. या गावातील जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या बहिणीला भाजपा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी बहीण मानले. रक्षाबंधन निमित्त जोंधळे कुटुंबीयांच्या घरी रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळी बहीण कल्याणी जोंधळे हिला दुचाकी आणि लॅपटॉप ओवाळणी दिली. कार्यक्रमाच्या सुरूवातील शहीद ऋषिकेश यांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले.
यावेळी शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांचे वडील रामचंद्र जोधळे, कोल्हापूर जिल्हा आजी माजी सैनिक वेल्फेअर संघटनेचे अध्यक्ष श्री. खांडेकर, कागल तालुका आजी-माजी संघटनेचे अध्यक्ष आनंदा पाटील, सदस्य बाजीराव पवार, प्रभाकर आत्माराम पाटील, विजयकुमार पाटील, मोहन कांबळे, लक्ष्मण कांबळे, जवान बाळकृष्ण चव्हाण, महेश मार्तंड, श्रीपती मस्कर, बळीराम पाटील, शिवाजीराव पवार आदी उपस्थित होते.
महेश लांडगे म्हणाले की, सीमेवर लढणारे जवान, आजी- माजी सैनिकांप्रती देशातील प्रत्येक बांधवाला आदर आहे. कोल्हापरच्या मातीशी माझ्या कुटुंबाचे विशेष नाते आहे. कसबा बावड्याच्या शासकीय कुस्ती केंद्रामध्ये उत्तमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवले. शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांना पाकिस्तान सीमेवर लढताना वीरमरण आले. त्यांच्या कुटुंबीयांची मानसिक अवस्था शब्दात व्यक्त न करता येणारी आहे. माझी व माझ्या कार्यकर्त्यांची राजकारण आणि पक्षविरहीत भावना आहे. कल्याणी जोंधळे हिला भाऊबीजेच्या दिवशी स्वत: भाऊ गमवावा लागला. मी आमदार असो किंवा नाही ऋषिकेशसारखा भाऊ समजून कधीही अडचणीच्या काळात मला हाक दे. हा भाऊ तुझ्या मदतीला धावून येईल. तुझ्या कुटुंबासोबत उभा राहील. शिक्षण, नोकरी आणि आयुष्यातील प्रत्येक वळणावर सोबत राहील, असेही आमदार लांडगे म्हणाले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोंधळे कुटुंबियांना घर बांधण्यासाठी मदत केली. घरचा वरचा मजला आमदार महेश लांडगे बांधून देणार आहेत. तसेच, कल्याणी हिला दुचाकी आणि लॅपटॉपही रक्षाबंधन निमित्त भेट देण्यात आला.
इंटेरिअर डिझाइनर शाखेची विद्यार्थीनी कल्याणी जोंधळे…
शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांची बहीण कल्याणी जोंधळे ही इंटेरिअर डिझाईन शाखेची विद्यार्थीनी आहे. नुकतेच तीचे लग्नही ठरले आहे. तीचे होणारे पती हे सिव्हील इंजिनिअर आहेत. कल्याणीच्या लग्नासाठी आणि पुढील शिक्षणासाठीही सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.