सरकारी हॉस्पीटलमधून कोरोनाचे 320 डोस लंपास

0

जयपूर : देशात कोरोना लशींच्या तुटवड्यानंतर आता लशींची चोरीही होऊ लागली आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमधील एका सरकारी रुग्णालयातून को-व्हॅक्सीनच्या तब्बल 320 डोसची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोग्य विभागाने अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लशीची चोरी होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे.

विशेष महत्वाचे म्हणजे, रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. मात्र ज्या ठिकाणाहून लशीची चोरी झाली आहे, त्या ठिकाणचा सीसीटीव्हीच चालत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रुग्णालयातीलच एखाद्या कर्मचाऱ्याच्या सहाय्याने ही चोरी झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याशिवाय, अवैधरित्या लस देणारे रॅकेट तर सक्रीय झाले नाही ना, यासंदर्भातही आरोग्य विभाग तपास करणार आहे.

दरम्यान सोमवारी दुपारपर्यंत एक कोटीपेक्षा अधिक नागरिकांना देणारे राजस्थान हे देशातील दुसरे राज्य ठरले आहे. राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. रघू शर्मा यांनी यासाठी राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदनही केले आहे. एवढेच नाही, तर राज्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घेण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.