घरात उरलेले वरण, ताक, कांद्याचे टरफले ठरु शकतात उपयोगी

0

पुणे : आपल्या घरात बनवलेल्या स्वयंपाकांपैकी बऱ्याचदा अन्न काहीसे उरते. उरलेले अन्न आपण सकाळी कचऱ्यात टाकून देतो. मात्र ते अन्न टाकून न देता त्याचा वापर बाल्कनी, टेरेस मधील कुंडीतल्या झाडांना खत म्हणून करता येईल. घरात वरण उरतं, ताक उरतं किंवा खराब होतं, कांदा चिरला की त्याची टरफलं आपण फेकून देतो.. हे सगळे जे उरलेले पदार्थ असतात, ते पदार्थच आपल्या झाडांसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतात. म्हणूनच त्या पदार्थांचा योग्य वापर करा आणि झाडांसाठी ते खत म्हणून वापरा.

मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक, फॉस्फरस, मँगनीज, लोह, कॅल्शियम हे झाडांच्या दृष्टीने पोषक ठरणारे अनेक पदार्थ कांद्यामध्ये असतात. त्यामुळे कांदा झाडांच्या वाढीसाठी अतिशय पोषक आहे. कांदा कापल्यानंतर त्याच्या साली, टरफलं बाजूला काढा आणि हवाबंद डब्यात टाका. खराब झालेल्या किंवा काळ्या पडलेल्या कांद्याचा वापरही यासाठी करता येतो. या डब्यात पाणी टाका आणि दोन ते तीन दिवस तो डबा तसाच झाकून ठेवा. कांद्याच्या सालीतील पोषक घटक पाण्यात मिसळले जातात. आता हे पाणी गाळून घ्या आणि त्यात आणखी तेवढेच पाणी टाका. आता ते पाणी थोडे थोडे करून झाडांच्या मुळाशी टाका. 

ताक खूप जास्त आंबट असले किंवा थोडेसे कडवट लागले तर आपण ते खात नाही. असे ताक आपण दुसऱ्या कोणत्या पदार्थामध्येही वापरू शकत नाही. त्यामुळे हे ताक सरळ सिंकमध्ये ओतून देण्यात येते. पण ताक फेकून देण्यापुर्वी थोडे थांबा. कारण त्याचा तुमच्या झाडांसाठी खूपच चांगला उपयोग होऊ शकतो. पण ताक जसेच्या तसे झाडांना टाकू नका. अन्यथा झाडे खराब होऊ शकतात. जेवढे ताक असेल तेवढेच किंवा त्याच्या दिडपट पाणी त्यात टाका आणि मग ते पाणी झाडांना द्या. झाडांना ताक टाकल्यानंतर मुळाजवळची थोडी थोडी माती खुरपणीने उकरा. यामुळे झाडांची झपाट्याने वाढ होईल.

बऱ्याचदा भात, पोळ्या असे सगळे पदार्थ संपतात, पण वाटीभर का होईना पण वरण उरलेलेच असते. उरलेल्या वरणाचे करावे काय, असा प्रश्न बऱ्याच मैत्रिणींना नेहमीच पडतो. या प्रश्नाचे सोपे उत्तर म्हणजे उरलेल्या वरणाचा उपयोग झाडांसाठी करणे. जेवढे वरण उरले आहे, त्याच्या दुप्पट पाणी त्यात टाका आणि ते पाणी झाडांना घाला. झाडांना वरण घातल्यानंतर थोडी- थोडी माती खुरप्याने उकरा. वरणातले सगळे पौष्टिक घटक झाडांना मिळतात आणि झाडांची चांगली वाढ होते. 

Leave A Reply

Your email address will not be published.