विधानपरिषद निवडणूक : दगाफटका टाळण्यासाठी CM उद्धव ठाकरे यांनी घेतला ‘मोठा’ निर्णय

0

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत बसलेल्या धक्क्यातून महाविकास आघाडीने धडा घेतला असून आता विधानपरिषद निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून सावध पावले टाकली जात आहेत. कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून या निवडणुकीतील कोटा शेवटच्या क्षणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना माहिती दिली आहे. अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडीची एकजूट आहे. कुठल्याही प्रकारची अडचण नाही. महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील, याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कल आहे.

अजित पवार यांनी म्हटले की, विधान परिषदेच्या निवडणूकीत चमत्कार कोणाच्या बाजूने घडेल, हे महाराष्ट्र सोमवारी पहाणार आहे. जे 26 चा आकडा गाठायला कमी पडतील, त्यांची विकेट जाईल, असे म्हणत पवार यांनी विधानपरिषदेची उत्कंठा वाढवली आहे.

दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राजकीय हालचाली वाढल्या असून प्रमुख नेत्यांच्या सातत्याने बैठका होत आहेत. चारही मोठ्या पक्षांचे आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. भाजपाचे आमदार ताज प्रेसिडेन्सी, काँग्रेसचे आमदार फोर सीझन, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ट्रायडंट व शिवसेनेचे आमदार वेस्टिन हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहेत.

कोणत्याही पक्षाकडे अतिरिक्त मते शिल्लक राहत नसल्याने पहिल्या व दुसर्‍या पसंतीची मते आपापल्या उमेदवारांना द्यावी लागतील. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या 26 मतांचे गणित जुळवण्यासाठी राजकीय पक्षांची धडपड सुरू आहे. तीन आमदार असलेली बहुजन विकास आघाडी आणि प्रत्येकी 2 मते असलेले एमआयएम व समाजवादी या पक्षांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. राज्यसभेत एमआयएमने काँग्रेसला, तर सपाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता.

शिवसेनेसोबतच्या अपक्ष आमदारांची पळवापळवी दोन मित्र पक्षच करीत असल्याचेही चित्र आहे. आज महाविकास आघाडतील तीन पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक होणार असल्याचे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

मोठ्या पक्षांचे नेते क्रॉसव्होटिंग होणार नाही याची दक्षता घेत आहेत. तसेच लहान पक्ष व अपक्षांची मते वळविण्यासाठी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते प्रयत्न करत आहेत. अर्थपूर्ण हालचाली होत असल्याची चर्चा आहे. 20 जूनला होणार्‍या निवडणुकीत 10 जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी एका उमेदवाराचा पराभव ठरलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.