साताऱ्यातील लॉकडाऊन तातडीने मागे घ्यावा : आमदार शिवेंद्रराजे भोसले

0

सातारा :  सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. हे निर्बंध अन्यायकारक आहेत. साताराकरांचा उद्रेक होऊ देऊ नका. एकिकडे निवडणुकीला प्रशासन विरोध करत नाही. दुसरीकडे बाजारपेठा मात्र बंद ठेवत असल्याने प्रशासनाचा हा निर्णय खूपच अन्यायकारक आहे. कडक निर्बंध लावल्याने व्यापाऱ्यांमधून विरोध होत आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंधाचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी सातारा जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाला व्यापारी आणि सामान्य नागरिकांनी विरोध केला आहे. आज जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन तातडीने मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. तसेच तुम्हाला निवडणुका चालतात आणि बाजरपेठाच का बंद ठेवायच्या ? असा प्रश्न जिल्हा प्रशासनाला विचारला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, एकच आठवडा व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याची संधी मिळाली. आत्ताच्या कडक लॉकडाऊनला नागरिकांचा आणि व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्यावा. निर्बंध कायम ठेवा. हवं तर विकेंड लॉकडाऊन मेडीकल सुविधा सोडली तर कडक करा. मात्र, लॉकडाऊन मागे घ्या. यासोबत रुग्ण संख्या का वाढत आहे या मागचे नेमके कारण काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पुण्यासारख्या महानगरात रुग्ण कमी होत आहेत. तर मग इथेच का वाढत आहेत. काही गोष्टीमध्ये प्रशासन कमी पडतय का याचा विचार करावा, असा सल्ला त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिला.

शिवेंद्रराजे म्हणाले, सातारकरांनी जिल्हा प्रशासनाला पहिल्यापासून सहकार्य केलं आहे. व्यापारी वर्गाने तर खूप मोठे सहकार्य केलं आहे. आमची मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन वगैरे करणार नाही. जिल्हा प्रशासनाला आम्हाला अडचणीत आणायचे नाही. कोरोना संकट काळात आमची सहकार्याची भूमिका राहील, असे शिवेंद्रराजे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.