कोणत्याही क्षणी राज्यात लागू शकते ‘लॉक डाऊन’

0

मुंबई : राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अनेक जिल्ह्यात कडक नियमांचे आदेश दिले असले तरी परस्थिती आटोक्यात येत नाही. सध्या लॉकडाऊन हा राज्याला परवडणारा नसला, तरी कोरोना संसर्गाची साखळी तोडायला दुसरा उपाय नाही, असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हदरम्यान दिला होता. मात्र कोरोना रुग्ण वाढल्यास डॉक्टर आणि नर्सेस आणायचे कुठून?, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं ठोस उत्तर मिळत नसल्यानं राज्यात कुठल्याही क्षणी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करून त्यांची मतं जाणून घेतली. संपूर्ण लॉकडाऊन न करता, वाढती रुग्णसंख्या रोखता येईल का, यादृष्टीने विचारविनिमय करण्यात आला. टेस्टिंग सेंटर्स, बेड्स, हॉस्पिटल्स, ऑक्सिजन पुरवठा या सुविधा वाढवणं प्रशासनाने वर्षभरात वाढवल्या आहेत, त्या आणखीही वाढवता येतील. मात्र, रुग्णसंख्येला पुरे पडू शकतील एवढे डॉक्टर-नर्सेस कुठून उपलब्ध होतील, हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळे लॉकडाऊनशिवाय कुठलाही पर्याय राज्य सरकारसमोर नाही.

राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरू असताना रुग्णसंख्येची वाढ अशीच कायम राहिली तर येत्या १० ते १५ दिवसांत सर्व बेड्स आणि संसाधनं अपुरी पडू लागतील, असं स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलं होतं. “राज्यात लसीकरण मोहिम मोठ्या पातळीवर सुरू आहे. आपण आरोग्य सेवांमध्येही वाढ करत आहोत. पण कोरोनाची साखळी नेमकी तोडायची कशी? यावर अद्याप लॉकडाऊनशिवाय इतर दुसरा कोणताच उपाय नाही. लॉकडाऊन आज जाहीर करत नसलो, तरी इशारा देतोय. दोन दिवसांत याबाबतचा निर्णय आणि निमावली जाहीर केली जाईल”, असंही मुख्यमंत्री म्हणाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.