लोकसभा जागा वाटप : उद्धव ठाकरे यांना 19 जागा मागण्याचा अधिकार नाही : शंभूराज देसाई
सामनातील अग्रलेखाला अर्थ नाही
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मविआत 19 जागा मागण्याचा अधिकार नाही, त्याच्यासोबत केवळ काही खासदार उरले आहेत. 13 खासदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकराले आहे. त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीकडे 19 जागा मागण्याचा अधिकारच राहिलेला नाही. त्यांनी तसा हक्क सांगणे हस्यास्पद आहे, असे मत मंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केले आहे.
मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, उद्धव ठाकरेंकडे जेवढे खासदार आहे, त्यांनी त्याच जागांवर आपला अधिकार सांगायला हवा. मविआत जागावाटपावरुन एकमत होणार नाही असे मी आज लिहून देतो, असा दावाही त्यांनी केला.
मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, संजय राऊत जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा राज्यात शांतता होती. ते जेव्हा पासून सामनात लिहायला लागले आहेत, तेव्हापासून त्याला दर्जा राहिला नाही. जेव्हा बाळासाहेब ठाकरे लिहायचे तेव्हा त्याला एक दर्जा होता. त्यामुळे मी आता अग्रलेख वाचत नाही. संजय राऊतांनी स्वत:ची काळजी घ्यावी, त्यांना परत सरकारी विश्रांतीची गरज आहे. आमच्या समर्थकांच्या भावना दुखवणार नाही, याची काळजी त्यांनी घ्यावी असा इशाराही देसाई यांनी दिला आहे.
शंभुराज देसाई म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात विरोधक कितीही एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही. उद्धव ठाकरेंना जसे शरद पवारांना भेटण्यासाठी सिल्वर ओकवर जावे लागले तसे केजरीवाल यांना भेटण्यासाठी दिल्लीला जावे लागले नाही, असा टोला देसाई यांनी लगावला आहे. मात्र, कितीही विरोधक एकत्र आले तरी सुद्धा मोदींना कितीही आव्हान देण्याचा प्रयत्न केला तरी देशात काही फरक पडणार नाही, असा दावाही त्यांनी केला.