पावसाची ओढ; संपूर्ण महाराष्ट्रात चिंतेचे ढग दाटले

0

पुणे : पावसाळा सुरु झालेल्या आहे, मात्र राज्यातील अनेक भागात अद्याप पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे. पोषक वातावरण नसल्याने २० जूनपासून मॉन्सूनमध्ये कोणतीही प्रगती झालेली नाही. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चिंतेचे ढग दाटून आले आहेत.

शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकणातील पणजी, राजापूर येथे हलका पाऊस झाला.
मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा आणि पन्हाळा येथे पावसाची नोंद झाली असून विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडला होता. कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला.

गेल्या आठवड्यात (२४ ते ३० जून) कोकण, मध्य महाराष्ट्रातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात असणार्‍या घाटमाथ्यासह विदर्भात मोठ्या प्रमाणावर पावसाने ओढ दिली आहे.

अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, जालना, जळगाव, औरंगाबाद या ६ जिल्ह्यात गेल्या आठवड्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात पावसात ६० टक्क्यांहून अधिक तूट आढळून आली आहे. १४ जिल्ह्यांमध्ये २० टक्क्यांहून अधिक प्रमाणात कमी पाऊस झाला आहे.

याबाबत हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, विषवत्तीय भागातील आफ्रिकेत पावसाला सुरुवात झाली की, तेथील शुष्क हवा आपल्याकडे ढकलली जाते. या हवेत धुलीकणांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आकाशात काळे ढग दिसत असले तरी ते उंचावर जाण्यास हे धुलीकण रोखतात. ढगांची निर्मिती झाली या ढगांमध्ये बाष्प असले तरी बाहेरील हवेतील शुष्क हवा त्यांचे थेंबात रुपांतर करण्यापासून रोखले जाते.

त्या ढगांमधील पाणी कमी होते. त्यामुळे पाऊस पडण्यासाठी आवश्यक असलेले पोषण वातावरण तयार होत नाही. त्यामुळे आकाशात काळे ढग दिसले तरी सध्या पाऊस पडताना दिसत नाही. सध्याची स्थिती अजून ११ जुलैपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

कोकणामध्ये पावसाळ्यात नेहमीच पाऊस पडत असतो. मात्र, सध्याच्या स्थितीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पुढील चार दिवस कोकणात कोठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

६ व ७ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस होऊन तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.