तीन दिवसात 3 टक्के परताव्याचे आमिष; टोळीला अटक, 56 लाखाची रोकड जप्त

0

नागपूर : इन्स्टाग्रॅमवर “विक्रांत एक्सचेंज’ नावाने पेज तयार करून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीला प्रताप नगर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली. या टोळीकडून ५६ लाखांच्या रोकडसह आठ आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार साहील विनोदसिंग चव्हाण (वय २४) याच्या इन्स्टाग्रॅमवरती “विक्रांत एक्सचेंज’ या होमपेजवरती एक जाहीरात पाहिली. या जाहीरातीत गुंतवलेल्या रकमेवर ३ दिवसात ३ टक्के व्याज परतावा मिळेल असे आमिष दाखवले होते.

साहीलने ही जाहिरात त्याचा मित्र शुभम काळबांडे यालाही ही जाहीरात दाखवली. दोघांनीही व्याज परताव्याच्या आमिषाला बळी पडून रोख तसेच ऑनलाइन गुंतवणूक केली. तीन दिवसांनंतर व्याजासह परतावा परत मागितला असता संबंधित व्यक्तीने “तुम्ही परत पैसे टाका. न टाकल्यास तुमचे आधीचे पैसे बुडले असे समजा’ असे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साहीलने प्रताप नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

घटनेच्या काही दिवस आधी फिर्यादी साहील हा विक्रांत एक्सचेंज या कथित कंपनीतून आलेल्या एका फोन काॅलद्वारे सांगण्यात आलेल्या अकाऊंटमध्ये पैसे जमा करीत होता. साहीलने संबंधित फोन नंबरवर संपर्क केला असता त्याला रोहीत पटेल नामक व्यक्ती फोन करीत असल्याचे सांगण्यात आले. राेहीतचा मित्र शुभम काळबांडे यानेही इन्स्टाग्रॅम पेजवरील संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला असता ११ मार्च रोजी शुभमला रक्कम कोणाकडे व कुठे सोडायची हे सांगितले.

दोघांनी दिलेल्या माहिती नुसार पोलिसांनी क्वेटा काॅलनी येथे सापळा रचला. तिथे विक्रांत एक्सचेंज नावाने दोघे जण आले होते. तसेच लगेचच तिसराही आला. त्याच्याशी शुभमने संपर्क साधला असता तो विक्रांत एक्सचेंजसाठी काम करीत असल्याचे सांगितले. पोलिसांनी तिघांनाही विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गायत्री नगर, क्वेटा काॅलनीचा पत्ता सांगितला.

पोलिसांनी पंचासमक्ष तिथे धाड टाकली असता काही जण तिथे पैसे मोजण्याच्या मशिनवर पैसे मोजत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना लकडगंज पोलिसांच्या मदतीने अटक केली. अटकेतील आरोपींमध्ये अर्जुन चंदुभा राठोड, धर्मेद्र अकोडावाला, निलेशकुमार मनुप्रसाद दवे, विष्णूभाई क्रिष्णादास पटेल, थिरमसिंग जयवंतसिंग राठोड, विक्रमसिंह धनाजी वाघेला, जोरूबा जोरूसी वाघेला यांना अटक करून त्यांच्याजवळून रोख ५८ लाख ३६ हजार ५०० रूपये जप्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.