चेरापुंजीला मागे टाकत महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पाऊस

0
सातारा : देशातील सर्वाधिक पाऊस होणाऱ्या चेरापुंजीच्या स्पर्धेत महाराष्ट्रातून रत्नागिरीतील पाऊस आघाडी घेत असताना अवघ्या तीन ते चार दिवसांत चित्र पालटून गेले. चारच दिवसांत महाबळेश्वरमध्ये १५०० मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक पावसाच्या रत्नागिरीलाच नव्हे, तर चेरापुंजीलाही मागे टाकत महाबळेश्वरच्या पावसाने देशात आघाडी घेतली आहे.
१ जूनपासून आजपर्यंत चेरापुंजीत ३५०० मिलिमीटर, तर महाबळेश्वरमध्ये सुमारे ३७०० मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर कायम होता. त्यानंतर जिल्ह्याच्या इतर भागांत पावसाने जोर धरला.
अगदी २१ जुलैपर्यंत रत्नागिरीमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाची नोंद होऊन हा पाऊस थेट चेरापुंजीच्या स्पर्धेत उतरला होता.
या काळात महाबळेश्वरमध्ये पावसाचे प्रमाण कमी होते. देशात मेघालय आणि आसामच्या काही विभागांमध्ये दरवर्षी मोठ्या पावसाची नोंद होते. यात चेरापुंजीने पावसाच्या प्रमाणाचे मोठे विक्रम केले असल्याने देशातील सर्वाधिक पावसाच्या स्थळांपैकी ते एक ठिकाण समजले जाते. मात्र, २०१७ ते २०१९ या तीन वर्षात चेरापुंजीत पावसाचे प्रमाण काहीसे कमी होते.
२०१८ आणि २०१९ या सलग दोन वर्षांतही महाबळेश्वरमध्ये पावसाने विक्रम नोंदवित चेरापुंजीला मागे टाकले होते. त्यानंतर गतवर्षी २०२० मध्ये महाबळेश्वरचा पाऊस तिसऱ्या क्रमांकावर जाऊन चेरापुंजीत पुन्हा पहिल्या क्रमांकाचा पाऊस नोंदविला गेला. मात्र,सध्या पुन्हा महाबळेश्वरने पावसात आघाडी घेतली आहे. नोंदीनुसार महाबळेश्वरमध्ये २४ जुलैपर्यंत सरासरीपेक्षा सुमारे ११५० मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे. रत्नागिरीतही सरासरीपेक्षा १२०० मिलिमीटर पाऊस अधिक झाला असला, तरी महाबळेश्वरमध्ये चारच दिवसांत विक्रमी १५०० मिलिमीटर पाऊस झाला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.