महाराष्ट्र : तब्बल 75 दिवसांनंतर एका दिवसात 5 हजारांवर नवे ‘कोरोना’ बाधित

0
मुंबई : राज्यात कोरोनाचा विळखा पुन्हा एकदा वाढू लागला आहे. तब्बल ७५ दिवसानंतर राज्यात एकाच दिवसात ५ हजारांहून अधिक नवीन कोरोना बाधित आढळून आले आहे. मुंबई, पुण्यासह विदर्भात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. गुरुवारी राज्यात एकाच दिवशी ५ हजार ४२७ नवीन कोरोना बाधित आढळून आले. त्याचवेळी ३८ जणांचा मृत्यु झाला आहे.

महाराष्ट्राच्या खालोखाल केरळ मध्ये गुरुवारी ४ हजार ५८४ नवीन कोरोना बाधित आढळून आले. महाराष्ट्र, केरळ वगळता देशातील अन्य राज्यांमधील नवीन कोरोना बाधितांची संख्या ५०० पेक्षा कमी आहे. सध्या केरळमध्ये सर्वाधिक ६० हजार ४५१ सक्रीय रुग्ण असून त्या खालोखाल ४२ हजार ४७ सक्रीय रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन मुंबईसह राज्यभरात खबरदारीचे घेण्याचे आदेश दिले आहे. मुंबईत एकाच इमारतीत ५ पेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यास ती इमारत सील करण्यात येणार आहे. विनामास्क फिरणार्‍यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहे.

मंगल कार्यालये, क्लब, उपहारगृह, शॉपिंग मॉल, रेस्टोरंट, कार्यालये या ठिकाणी एकावेळी ५० हून अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर ब्राझीलहून येणार्‍या प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.