पुणे : दिलेल्या नोटीसप्रमाणे कारवाई न करता नोटिसा परत घेण्यासाठी 11 लाखाच्या लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून 5 लाख 50 हजार रूपये घेतल्याप्रकरणी पुणे अॅन्टी करप्शन विभागाच्या कोल्हापूर युनिटने राधानगरी-कागल उपविभागाचे प्रांताधिकारी आणि फराळी गावाच्या सरपंचास ताब्यात घेतले आहे. अॅन्टी करप्शनच्या या कारवाईमुळे संपुर्ण पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्रसेनजीत बबनराव प्रधान (49, प्रांताधिकारी, राधानगरी-कागल उपविभाग, कोल्हापूर, सध्या रा. फ्लॅट नं. 303, सी विंग, विंसगेट अपार्टमेंट, न्यूज पॅलेस जवळ, कोल्हापूर. मुळ रा. घर नं. 450, मित्रनगर, नवघन कॉलेज रोड, बीड शहर, जि. बीड) आणि संदीप जयवंत डवर (41, सरपंच – फराळी ग्रामपंचायत, ता. राधानगरी. रा. मु.पो. लिंगाचीवाडी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
तक्रारदार यांचे क्रशर असून सदर व्यवसाय बंद करण्याबाबत ग्रामपंचायत फराळी व उपविभागीय अधिकारी राधानगरी-कागल यांच्या कार्यालयाकडून नोटीसा देण्यात आल्या होत्या. सदर नोटीसप्रमाणे कारवाई न करण्यासाठी आणि नोटिसा परत घेण्यासाठी फराळे गावचे सरपंच डवर यांनी स्वतःसाठी 1 लाख रूपये आणि प्रांताधिकारी प्रसेनजीत बबनराव प्रधान यांच्यासाठी 10 लाख रूपयांची मागणी केली होती. प्रांताधिकारी प्रधान यांनी सरपंच डवर यांच्या लाच मागणीस दुजोरा देऊन सदरची लाच रक्कम डवर यांचेकडे देण्यास सांगितले होते. दरम्यान, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. त्याची एसीबीकडून दि. 8 आणि 9 जानेवारी 2022 रोजी पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये प्रधान आणि डवर हे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. आज (रविवार) सरकारची पंचासमक्ष पहिला हप्ता म्हणून 5 लाख 50 हजार रूपये डवर याने घेतले. त्यास रंगेहाथ पकडण्यात आले.
त्यानंतर प्रांताधिकारी प्रधान यांना देखील एसीबीकडून ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुरज गुरव, अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा, यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर एसीबीचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलिस निरीक्षक नितीन कुंभार, कर्मचारी अजय चव्हाण, शरद पोरे, मयूर देसाई, रूपेश माने, अमर भोसले, विकास माने या पथकाने केली आहे.