इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या गोंधळ आणि हिंसाचारात 127 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय.
न्यूज एजन्सी एएफपीनं पोलिसांच्या हवाल्यानं सांगितलं की, पूर्व जावा येथील एका स्टेडियममधील सामन्यातील पराभवामुळं निराश झालेल्या प्रेक्षकांनी फुटबॉल खेळपट्टीवरच गोंधळ घातला. या चेंगराचेंगरी आणि हिंसाचारात दोन पोलिसांनाही आपला जीव गमवावा लागला. स्टेडियममध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 127 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
रिपोर्टनुसार, ही घटना पूर्व जावाच्या मलंग भागातील कंजुरुहान स्टेडियममध्ये घडली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओंमध्ये लोकांनी सीमा ओलांडून पळून जाण्याचाही प्रयत्न केल्याचं दिसून येतं. स्टेडियममध्ये झालेल्या गोंधळानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर केला. स्टेडियममधील गोंधळ काही वेळात थांबला, पण संतप्त लोक रस्त्यावर आले आहेत. हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.