औरंगाबाद : राज्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मात्र आता अशातच मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य आणि मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांमध्ये मतभेद असल्याचे समोर येत आहे. छत्रपती संभाजीराजेंनीही या संघटनांचं नेतृत्व करू नये, असे म्हणत मराठी क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी थेट संभाजीराजे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईत झालेल्या बैठकीत छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून दमदाटी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सोबतच संभाजीराजे मराठा समाजाच्या मागण्याबाबत चर्चा चालू असताना बैठकीत काही बोलू दिले नाही. असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून करण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाने पूर्वीपासूनच कोणाचंच नेतृत्व नाही, अशी भूमिका घेतली आहे, त्यामुळे छत्रपती संभाजीराजेंनीही या संघटनांचं नेतृत्व करू नये, अशी स्पष्टोक्ती मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. त्यामुळे मराठा समाजासाठी चाललेल्या या क्रांती मोर्चाच्या भूमिकेकडे आता राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या आरोपांमुळे प्रकरण चिघळणार असल्याचे दिसत आहे.
शुक्रवारी औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉ. शिवानंद भानुसे म्हणाले की, मराठा समाजाच्या प्रश्नांवर राज्य शासनातर्फे गुरुवारी एक बैठक बोलावली होती. मुंबईत झालेल्या बैठकीत औरंगाबादमधून सुनील कोटकर, प्रा. चंद्रकांत भराट, सतीश वेताळ आणि स्वतः भानुसे यांना बोलावण्यात आले होते. कोटकर, भराट आमि वेताळ यांना बैठकीमध्ये प्रवेशच देण्यात आला नाही.
बैठक सुरु होण्याच्या आधीच छत्रपती संभाजीराजे यांनी बैठकीत कुणीही बोलू नका, नाही तर मी बैठक सोडून निघून जाईन, असे सांगितले. अशा प्रकारे प्रत्येकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाद्वारे संभाजीराजेंवर करण्यात आला आहे. त्यामुळे आता संभाजीराजे यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे आहे. तसेच त्यांच्या भूमिकेकडे देखील अनेकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चा गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या मागण्यांसाठी पुढे येत आहे. अनेक मोर्चे, आंदोलनं त्यांच्याकडून करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांपासून ते भाजप नेते नितीन गडकरी यांसारख्या जेष्ठ नेत्यांच्या घरावर मागण्यांसाठी मोर्चा काढण्याचा इशारा देऊन, मराठा समाजाच्या मागण्या सरकार दरबारी मांडण्यात आल्या होत्या. मागण्या मान्य करुन घेण्यासाठी प्रयत्न चालू असतानाच आता हा समन्वयकांमधला वाद नेमकं काय वळण घेणार हे पहावं लागले.