आटपाडी : उच्च न्यायालयाच्या बंदीच्या आदेश उल्लंघन करून बैलांच्या छकडा शर्यत घेतल्या प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थक 40 कार्यकर्त्यांवर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी उच्च न्यायालयाने बैलांच्या शर्यतीला बंदी घातलेली असतानाही बैलांच्या छकडा गाडी शर्यती आज वाक्षेवाडीत सकाळी साडेसहा ते साडेसात दरम्यान घेतल्या. शर्यती अगोदर पोलीस प्रशासनाने त्यांच्यासोबत अनेक बैठका घेऊन शर्यत घेऊ नये यासाठी मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच कलम 149 प्रमाणे त्यांना नोटीस दिली होती. तसेच नऊ गावात संचारबंदी जाहीर केली होती.
उच्च न्यायालयाच्या बंदीचा आदेश झुगारून बैलांच्या शर्यती घेणे, covid-19 मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणे, संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणे केल्याप्रकरणी पडळकर आणि त्यांच्या समर्थक 40 कार्यकर्त्यावर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कलम 188, 269,270, आदी कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.