आमदार राहुल कुल यांनी 500 कोटी रुपयांचे मनी लॉन्डरिंग केले : संजय राऊत

0

मुंबई : दौंड येथील भीमा पाटस साखर कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी तक्रार ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सीबीआयकडे दाखल केली आहे. संजय राऊत यांनी आज ट्विटवरून ही माहिती दिली. तसेच, पत्रकार परिषदेतही याबाबत सविस्तर भूमिका मांडली. भीमा पाटस साखर कारखाना हा भाजप आमदार राहुल कुल यांच्या मालकीचा आहे.

आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, भाजप आमदार राहुल कुल हे देवेंद्र फडणवीसांचे खास आहेत. त्यांनीच भीमा पाटस कारखान्यात घोटाळा करून 500 कोटींची मनी लॉन्ड्रिंग केले आहे. या भ्रष्टाचाराचे प्रकरण मी दोन महिन्यांपूर्वी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोपवले आहे. मात्र, दोन महिन्यांपासून ते मला भेटीसाठी वेळ देत नाहीये. त्यामुळे राहुल कुल यांच्या कारखान्याची मी आता सीबीआयकडे तक्रार केली आहे. सीबीआयने मला पोचपावतीही दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, भीमा पाटस कारखान्यात 500 कोटींचे लॉन्ड्रिंग झाल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. हे सर्व पुरावे आता सीबीआयकडे दिले असून सीबीआय या प्रकरणात काय कारवाई करते, हे पाहू. विरोधी पक्षातील लोकांना अगदी 2 ते 5 लाख रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले जात आहे. मात्र, राहुल कुल यांनी 500 कोटींचा घोटाळा केला आहे.

संजय राऊत म्हणाले, पुरावे देऊनही देवेंद्र फडणवीसांनी राहुल कुल यांच्याविरोधात काहीही कारवाई केली नाही. त्यावरून गृहमंत्री फडणवीस हे केवळ विरोधकांवरच कारवाई करतात. मात्र, स्वपक्षातील भ्रष्टाचार करणाऱ्यांना, चोर, लुटारूंचे फडणवीस संरक्षण करतात. फडणवीसांना आवाहन आहे की, त्यांनी दरोडेखोरांना पोटाशी घालू नये. महाराष्ट्रात हे फार काळ चालणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.