हैदराबाद : हैदराबादमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. 28 मे रोजी 17 वर्षांची तरुणी पार्टीनंतर घरी परतत होती. त्याचवेळी हैदराबाद येथील जुबली हिल्स परिसरात तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. हा सर्व प्रकार तिने घरच्यांना सांगितला. त्यानंतर घरच्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. याप्रकरणी आमदाराच्या मुलाचे नाव समोर आले होते. अखेर AIMIM आमदाराच्या मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 6 आरोपींना अटक केली आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये 5 जणं अल्पवयीन असल्याचे समोर आलंय. तसेच, आमदाराच्या मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
‘5 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. यातील 4 जणांना बालसुधारगृहात पाठवण्यात आलंय. या प्रकरणाच्या तपासणीसाठी अनेक सीसीटीव्ही फुटेज गोळा केले होते.
कलम 164 अंतर्गत पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला होता. तर, आमदाराच्या मुलावर पोलिसांनी सामूहिक बलात्काराऐवजी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.’ अशी माहिती हैदराबाद पोलिस आयुक्त सी. व्ही आनंद यांनी दिली.
दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार, ज्यावेळी पीडितेवर बलात्कार झाला तेव्हा घटनास्थळी आमदाराचा मुलगा उपस्थित नव्हता असं म्हटलं जात आहे. दरम्यान, दुसऱ्या कारमध्ये त्याने पीडितेसोबत दुष्कर्म केलं असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तसेच, बलात्काराच्या गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार ही सरकारी होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.