मुंबई : महाराष्ट्रात पुढील 2-3 दिवसांमध्ये मान्सून सक्रिय होईल, अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे. मान्सून वेगानं पुढे सरकत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.
भारतीय हवामान विभागाचे के.एस.होसाळीकर यांनी माहिती शेयर केली आहे. मान्सून पुढे सरकत असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. मान्सून अरबी समुद्रातून पुढे सरकत असून लक्षद्वीप, केरळ, किनारपट्टीचा काही भाग, दक्षिण कर्नाटक, उत्तर कर्नाटक, आंध्र प्रदेशातील काही भाग आण तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालच्या उपसागरात मान्सून पुढे सरकला असल्याचं त्यांनी सांगितलं.
पुढचे 2, ३ दिवस राज्यामध्ये बहुतेक ठिकाणी गडगडासहित पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठाणे, रायगड, दक्षिण कोकण, पुणे, कोल्हापूर,सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून 3 जूनला केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडीने यंदाचा मान्सून सरासरीच्या 101 टक्के असेल असा अंदाजानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 101 टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटलं जातं.