मान्सून केरळला धडकणार; तुरळक पावसाची शक्यता

0

नवी दिल्ली : नैऋत्य मान्सून आज केरळमध्ये पोहोचणार आहे. आता तो देशाच्या सागरी हद्दीत दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) लवकरच त्याचे केरळमध्ये आगमन झाल्याची घोषणा करू शकते. मान्सून सामान्यतः 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये तो 29 मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता. तर तत्पूर्वी 2021 मध्ये तो 1 जूनला पोहोचला होता.

IMD ने सोमवारपासून केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. IMD च्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून सध्या लक्षद्वीप व दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागातून पुढे सरकत आहे.

रविवारी एका अलर्टमध्ये आयएमडीने म्हटले आहे- राजस्थान, छत्तीसगड, ओडिशा, अंदमान व निकोबार बेट समूह, केरळ, कोकण व गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, किनारपट्टी आंध्र प्रदेश व यानाम, तेलंगणा, रायलसीमा आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी वीजांच्या कडकडाट, मेघगर्जना व सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत केरळच्या पठानमथिट्टा व इडुक्की जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

यंदा मान्सून सामान्य राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पाऊस सामान्य झाल्यास देशातील अन्नधान्य उत्पादनही सामान्य होईल. म्हणजेच महागाईपासून दिलासा मिळू शकतो. देशातील शेतकरी साधारणत: 1 जूनपासून खरीप पिकांची पेरणी सुरू करतात. याच वेळी मान्सून भारतात प्रवेश करतो. पिकाची पेरणी ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत सुरू असते.

Leave A Reply

Your email address will not be published.