पहिली ते चौथीची शाळा सुरु करण्यासाठी हालचाली

0

मुंबई : ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीपर्यंतची शाळा सुरू झाल्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाने पहिली ते चौथीचे वर्ग भरावेत म्हणून हालचाली  केल्या आहेत. त्यासाठी विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांशी ऑनलाइन बैठकीत चर्चा केली.

पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्यासाठी पालक आग्रही असल्याची माहिती यावेळी अधिकार्‍यांनी दिली. त्यामुळे दिवाळीनंतर पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णवाढ आटोक्यात राहिल्यास बालवाडीपासूनचे वर्गही सुरू होऊ शकतात.

ऑनलाईन वर्गाला विद्यार्थी वैतागले आहेत. बालवाडीपासूनचे सर्व वर्ग भरावेत, अशी शालेय शिक्षण विभागाचीही इच्छा आहे. मात्र, कोरोना रुग्णसंख्येचा आलेख कसा राहतो, याकडे विभागाचे लक्ष आहे. दिवाळीनंतर म्हणजे १० नोव्हेंबरनंतर रुग्णांची आकडेवारी पाहून सर्व वर्ग खुले करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

सध्या शहरी भागातील इयत्ता ८ ते १२ वी पर्यंतचे वर्ग भरवले जात आहेत. तर ग्रामीण भागात इयत्ता ५ ते १५ वी पर्यंतचे वर्ग भरवले जात आहेत. ग्रामीण भागातील ४३ हजार ७४९ शाळांपैकी ४१ हजार ३७३ शाळा सुरू झाल्या असून त्यामध्ये ३५ लाख ५३ हजार ४१७ विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. शहरी भागातील १२ हजार ५७९ शाळांपैकी ९ हजार ९३६ शाळा सुरू झाल्या असून त्यामध्ये १५ लाख २८ हजार ९४१ विद्यार्थी उपस्थित आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

येत्या १० नोव्हेंबर नंतर कोरोना राज्य कृती दलाची बैठक होईल. त्यात राज्यातील रुग्णसंख्येचा आढावा घेण्यात येईल. कोरोना रुग्णवाढ नसल्यास शाळा उघडण्याबाबत सकारात्मक निर्णय होईल. यासंदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.
-वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री

Leave A Reply

Your email address will not be published.