फलटण : ‘त्या आंडू-पांडूंनी माझा नाद करु नये’ बारामतीला वळविलेलं पाणी अडवायचं धाडस आम्ही केलं. त्यामुळं आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे. सत्य काय ते लवकरच बाहेर येईल. आपण कदापि मागं हटणार नाही. आपण शरद पवार व श्रीमंत रामराजे यांच्यापुढं हार मानली नाही, तर आंडू-पांडूसमोर मी हार मानणार नाहीय. त्यांनी माझा नादपण करु नये, असा इशाराच खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकरांनी विरोधकांना दिला. शायनिंग महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते.
स्वराज फाऊंडेशन व सांसा फाऊंडेशन आयोजित ‘शायनिंग महाराष्ट्र’ या प्रदर्शनाचा समारोप केंद्रीय संचार, राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आमदार जयकुमार गोरे, आमदार राम सातपुते, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळूंखे-पाटील, जिल्हा परिषद सदस्या ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर, पुणे रिजनच्या जनरल पोस्ट मास्तर मधुमिता दास, भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह सांसा फाऊंडेशन व भाजपच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
केंद्र शासनानं जनतेच्या हितासाठी कोणकोणत्या योजना जनतेसाठी अंमलात आणल्या आहेत, याची माहिती हजारो लोकांनी “शायनिंग महाराष्ट्र” या प्रदर्शनाद्वारे घेतलीय त्याचा लाभही त्यांना निश्चितपणे मिळेल असा विश्वास व्यक्त करुन मंत्री चौहान म्हणाले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचं काम आदर्शवत असून त्यांची प्रेरणा घेत अन्य खासदारांनी काम करायला हवं. फलटण इथं पासपोर्टचे अॉफिस व्हावं, अशी खासदार निंबाळकर यांची सातत्याची मागणी आहे. त्यानुसार फलटण येथील पोस्ट अॉफिसमध्ये पासपोर्टची सुविधा लवकरच उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाहीही मंत्री चौहान यांनी दिलीय.
कार्यक्रमाचं प्रास्तविक जयकुमार शिंदे यांनी केलं. सूत्रसंचलन प्रा. सतीश जंगम यांनी केलं, तर अनुप शहा यांनी आभार मानले.