पिंपरी : भारत गौरव अवॉर्ड फाउंडेशन दिल्ली यांच्याकडून दिला जाणारा भारत गौरव पुरस्कार यावर्षी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना देण्यात आला. खासदार बारणे यांच्या संसदेतील आणि स्थानिक पातळीवरील कामाची दखल घेऊन भारत गौरव या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री मनसुकलाल मांडविया यांच्या हस्ते हा पुरस्कार खासदार बारणे यांना प्रदान करण्यात आला.
खासदार डॅा. किरीट सोलंकी (गुजरात),खासदार सुधीर गुप्ता (मध्य प्रदेश), खासदार रमेशचंद्र कौशिक (हरियाणा) यांना देखील पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
भारत गौरव अवॉर्ड फाउंडेशनकडून दरवर्षी सामाजिक, शिक्षण, क्रीडा, सामाजिक न्याय,आरोग्य, पोलीस सेवा, महिला सशक्तीकरण,कला व संस्कृती, सरकारी सेवा, पत्रकारिता,विज्ञान व तंत्रज्ञान, वीरता, औद्योगिक क्षेत्र,पर्यटन आदी विभागात उल्लेखनीय काम करणा-यांचा भारत गौरव पुरस्काराने सन्मान केला जातो. मागील अनेक वर्षांपासून हा पुरस्कार दिला जातो. संसदेत उत्कृष्ठ काम करणा-या अनेक खासदारांना आजवर हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
संसदेत सर्वाधिक प्रश्न मांडणे, संसदेतील सर्वाधिक उपस्थिती आणि सर्वाधिक चर्चांमध्ये सहभाग आदींच्या माध्यमातून केलेल्या उत्कृष्ठ कामकाजाबद्दल खासदार बारणे यांना हा पुरस्कार देण्यात आला.
खासदार बारणे यांचे संसदेत आणि स्थानिक पातळीवर चांगले काम आहे. मागील निवडणुकीत अनेक अडचणींवर मात करत जनसंपर्क आणि त्यांनी केलेल्या विविध कामांच्या माध्यमातून त्यांनी विजय संपादन केला आहे. जनतेशी जोडून राहणारा,जनमानसात राहणारा, लोकसभेत सर्वाधिक उपस्थिती ठेऊन काम करणारा खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. देशाच्या लोकसभेत चांगले काम करणा-या टॉप पाच खासदारांमध्ये खासदार बारणे यांचे नाव आहे. सलग पहिल्या पाच खासदारांमध्ये त्यांचा क्रमांक लागला आहे, हा योग खासदार बारणे यांनी साधला आहे.
यापूर्वी चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा संसदरत्न पुरस्कार खासदार श्रीरंग बारणे यांना सलग पाच वर्ष मिळाला आहे. यावर्षी त्यांची संसद महारत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे. फाउंडेशनने खासदार बारणे यांच्या नावाची महासंसदरत्न पुरस्कारासाठी घोषणा केली आहे. कार्यक्रमाचे संयोजन डॅा.सन्देश यादव यांनी केले.