अहमदनगर : पारनेर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी हार, बुके ऐवजी वही, पेन स्वरुपात सत्कार करावा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी केले आहे.
पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी यापुढे हार, बुके स्वरुपातील कोणताही सत्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे, ज्या कार्यकर्त्यांना सत्कार करायचा असेल त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना मदत करावी, असं आवाहन लंके यांनी केले आहे. मतदारसंघातील ज्यांना सत्कार करायचा असेल त्यांनी वही, पेन, कंपास, शाळेसाठी कपडे अश्या वस्तू देऊन माझा सत्कार करण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमाची सुरुवात झाली असून एका कार्यकर्त्याने लहान मुलांसाठी 50 चपलाचे जोड, कपडे, वह्या, देऊन केल्याची माहिती निलेश लंकेंनी दिली.
हार, बुके स्वरुपात सत्कार न स्वीकारण्याच्या निर्ण्याचा याचा फायदा गोरगरीब जनतेला होणार आहे. ज्याला परिस्थितीची जाणीव आहे, तोच हा विचार करू शकतो, असं मत लंके यांनी व्यक्त केलेय. विशेष म्हणजे शिक्षण घेतांना मला देखील कंपास नव्हती तर शाळेत जाण्यासाठी पासला पैसे नव्हता. त्यामुळे मी हा निर्णय घेतल्याचे आमदार लंके म्हणाले. लंके यांनी घेतलेल्या या निर्णयाचा फायदा मतदार संघातील गरजू विद्यार्थ्यांना होणार असून त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.