मुंबई : एकनाथ शिंदे व संपूर्ण शिंदे गट ईडीच्याच भीतीने भाजपसोबत गेला, असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेससोबतही हाच प्रयोग सुरू आहे, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
तसेच, अजित पवार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार, असा दावा अंजली दमानिया यांनी केला होता. त्यावर आज पत्रकारांनी शरद पवारांना विचारले असता ‘मला त्याबाबत काही माहिती नाही’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. विशेष म्हणजे शरद पवार यांनी हा दावा फेटाळला नाही. त्यामुळे राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या जवळकीची चर्चा रंगली असतानाच नेमके कोण कोणासोबत? याबाबत आणखी संभ्रम निर्माण झाला आहे.
तुरुंगात जाण्याच्या भीतीने एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर येऊन रडले होते, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केल आहे. तसेच, आपण भाजपमध्ये गेलो नाही तर तुरुंगात जाऊ, अशी भीतीही मातोश्रीवर एकनाथ शिंदेंनी वर्तवली होती, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. त्यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबतचे 40 आमदार हे ईडीच्या भीतीनेच भाजपसोबत गेले. ईडीच्या भीतीनेच त्यांनी शिवसेनेत बंड केले आहे. त्यांचा हिंदुत्वाचा दावा धादांत खोटा आहे.
शिंदे गटाला ज्याप्रमाणे ईडीची भीती दाखवून बंड करायला लावले, तसाच प्रयोग सध्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना विविध प्रकरणांची भीती दाखवून त्रास दिला जात आहे, असा गौप्यस्फोट पुढे संजय राऊतांनी केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोण फुटणार किंवा कोणत्या नेत्याच्या नेतृत्वाखाली बंड होणार?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते असूनही अजित पवार भाजपबाबत नरमाईची भूमिका घेत आहेत. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये जातील, असा दावा अंजली दमानिया यांनी केला होता. त्यावर आज शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर अजित पवारांबाबत मला काही माहिती नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. विशेष म्हणजे शरद पवारांनी अंजली दमानियांचा दावा फेटाळला नाही. त्यामुळे पुन्हा संभ्रम निर्माण झाला असून शरद पवार किंवा अजित पवारांची नेमकी खेळी काय? भूमिका काय?, असेही प्रश्न उपस्थित झाले आहेत.