मुंबई : पंकजाताई आणि माझ्यात संबंध काही ठीक नाहीत. हे संबंध सुधारण्यासाठी मी अनेकदा प्रयत्न केले. पण त्यात मला यश आले नाही. आपण राजकारण वेगवेगळे करू; पण कुटुंब म्हणून एकत्र राहू, असे मला वाटत होते. पण ते शक्य झालं नाही, अशा शब्दांत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यासोबतच्या नात्याबद्दल भाष्य केले.
धनंजय मुंडे यांनी एका मुलाखतीत आपल्या जीवनासोबत काही कौटुंबीक घटनाही उलगडून सांगितल्या. त्यात त्यांनी बहिण पंकजा मुंडे यांच्यासोबत सध्या असलेल्या संबंधाबाबत काही गोष्टी मांडल्या. ते म्हणाले की, खरं तर मी आणि पंकजाताई राजकीयदृष्टया ज्यावेळी वेगळे झालो, त्याच्यानंतर आमच्या दोघांचे संबंध काही सांगण्यासारखं नाहीत. पण, त्यापूर्वीचे संबंध असं होते की माझ्या सख्खा बहिणींकडून कधी राखी बांधली नाही. पण पंकजाताईंकडून कायम राखी बांधून घ्यायचो. आई-वडिलांनी मला सांगितले होते की, राखी बांधायची असेल तर पहिली पंकजाताई, प्रीतम, यशू आणि त्यानंतर सख्या बहिणींकडून बांधून घ्यायची. त्यामुळे मला कळायला लागल्यापासून मी त्यांच्याकडूनच राखी बांधून घेत होतो. माझं आणि पंकजाताईचं जेवढं जमतं होते, तेवढं कोणचंही जमत नसेल.
आमच्यामध्ये २००९ पर्यंत चांगले संबंध होते. माझे वडिल पंडीतअण्णा गेल्यानंतरसुद्धा मी ते संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले. पण, ते शक्य झालं नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर आम्ही सर्वांनी एकत्रित यायला पाहिजे, यासाठीही मी प्रयत्न केला. भले राजकारण वेगवेगळे करू. पण कुटुंब म्हणून एकत्र यायला हवे, यासाठी अनेकदा प्रयत्न करूनही मला त्यात यश मिळाले नाही. सुख, दुःखात सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, असे मला वाटते. मी घरात मोठा आहे, त्यामुळे मला घर म्हणून सर्वांनी एकत्र राहून संवाद ठेवायला हवा, असे वाटत होते, अशी खंतही धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली.
गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यानंतर मी दिल्लीला गेलो होतो. त्यावेळी भाजपच्या कार्यालयातून त्यांचे पार्थिव विमानतळाकडे निघाले होते. तेथून ते विमानाने परळीला आणण्यात येणार होते. आप्पांच्या पार्थिवाचे दर्शन रस्त्यातच झाले. त्यानंतर मी विमानतळावर गेलो, त्यावेळी त्यांच्यासोबत विमानात जाता आलं नाही. तसेच, त्यांचं शेवटचं दर्शनसुद्धा मला घेता आलेलं नाही, ही माझ्या जीवनात आयुष्यभर सलणारी गोष्ट आहे.