‘सावरकर गौरव यात्रा’ नव्हे, हि तर ‘अदानी बचाव यात्रा’ : संजय राऊत

0

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा त्याग व देशभक्तीच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी राज्याच्या गावागावात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यावर ती ‘सावरकर गौरव यात्रा’ नव्हे तर ती ‘अदानी बचाव यात्रा’, ‘खुर्ची बचाव यात्रा’ आहे, असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडले आहे.

आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भाजपचा काहीही संबंध नव्हता. आरएसएसने तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाळीत टाकले होते. सावरकरांचे हिंदूत्व हे शेंडी जानव्याचे नव्हते. त्यांचे हिंदूत्व विज्ञाननिष्ठ होते. आता भाजप सावरकरांवरुन राजकीय ढोंग करत आहे. भाजप काढत असलेली यात्रा सावरकर गौरव यात्रा नव्हे तर अदानी बचाव यात्रा आहे. खुर्ची बचाव यात्रा आहे. अदानींच्या लुटमारीपासून लक्ष विचलीत करण्यासाठीच भाजपने ही यात्रा काढली आहे.

दुसरीकडे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून अवमान केल्याप्रकरणी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. छत्रपती शिवाजी महाराज अथवा इतर थोर व्यक्तींविषयी त्यांनी केलेली वक्तव्ये सकृतदर्शनी कायद्याच्या कक्षेत गुन्हा ठरत नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. त्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. संजय राऊत म्हणाले, भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा भाजपला छत्रपती शिवाजी महाराज गौरव यात्रा काढावीशी वाटली नाही का? भगतसिंह कोश्यारींनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला तेव्हा भाजपला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासाठी गौरव यात्रा काढावीशी वाटली नाही का? छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले, सावित्रीबाई फुले तुमचा स्वाभिमान नव्हता का? महाराष्ट्रातील जनता हे ढोंग पाहत आहे.

संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेसंदर्भात घोषणा केली. तेव्हा मुख्यमंत्री स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत दोन वाक्य उत्सफूर्तपणे बोलू शकत नव्हते. एक कागद समोर होता तोच एकनाथ शिंदे वाचून दाखवत होते. एकनाथ शिंदे यांना सावरकरांविषयी काही माहिती तरी आहे का? सावरकरांच्या दोन क्रांतीकारक बंधूंचे नाव तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगू शकतात का? संपूर्ण शिंदे गट हा गद्दार आहे. तो काय सावरकर गौरव यात्रा काढणार.

संजय राऊत म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर महान क्रांतिकारक होते. त्यांच्याबदल आम्हाला आदर आहे. गद्दारांनी आम्हाला वीर सावरकर समजावण्याचा प्रयत्न करू नये. शिवाजी पार्कच्या बाजूला सावरकरांचे स्मारक उभारण्यात बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान आहे. सावरकरांचे हिंदूत्व आम्ही स्वीकारले आहे. आमचे हिंदूत्व विज्ञानवादी आहे. आम्ही सावरकर जगलोय आणि जगतोय. भारतीय जनता पक्ष म्हणजे सावरकर नाहीत. त्यांनी यात्रा काढणे ही सावरकरांची सर्वात मोठी बदनामी आहे.

संजय राऊत म्हणाले, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना आमची भूमिका समजावून सांगितली आहे. सावरकर आमचे श्रद्धास्थान आहेत. त्यांना धक्का लावता येणार नाही. आज मी राहुल गांधी यांच्याशी संपर्क करणार असून त्यांनाही आमची भूमिका समजावून सांगेल. शरद पवार यांनी आमची भूमिका बैठकीत मांडली आहे. त्यावर नक्कीच सकारात्मक तोडगा निघेल.

Leave A Reply

Your email address will not be published.