कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेना आणि शिंदे गटाचे पदाधिकारी भिडले

0

बुलडाणा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनात शिवसेना ठाकरे गटाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम ३ सप्टेंबर रोजी सुरू असताना आमदार संजय गायकवाड समर्थित शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. वाद घालून धक्काबुक्की करत खुर्च्यांची फेकाफेक केली. याप्रकरणी चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात शिवसेनेतील शिंदे व ठाकरे गटाच्या नियुक्त्या होऊ लागल्या आहेत. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी शनिवारी आयोजित केला होता. प्रमुख वक्ते लक्ष्मण वडले यांच्या उपस्थितीत या सत्कार सोहळ्याला सुरुवात झाली.

दरम्यान, शिंदे गटाचे कार्यकर्ते यावेळी सभागृहात शिरले. यावेळी त्यांनी घोषणाबाजी करत सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. काही कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची फेकाफेक करून तोडफोड केली. अचानक सुरू झालेल्या राड्यात काहींना धक्काबुक्कीही करण्यात आली. मात्र या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. नंतर अधिक पोलिस कुमक आल्यावर चौघांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.