नवी दिल्ली : कोरोनाची एक लाट संपून दुसरी लाट येत आहे. यातच लसीकरणास सुरुवात झाल्याने थोडेसे भितीचे वातावरण कमी आहे. ब्रिटन पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला कोरोना विषाणूचा नवा प्रकार संशोधकांची चिंता वाढवणारा ठरला आहे.
कोरोनाच्या या नव्या विषाणूचा फटका सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियान तयार केलेल्या कोरोना लसीला बसला आहे. सीरमची ऍस्ट्राझेनेका कोविड लस वापरण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेनं घेतला होता. मात्र आता दक्षिण आफ्रिकेनं आपला निर्णय बदलला आहे. तुम्ही पाठवलेले कोरोना लसीचे १० लाख डोज परत घ्या, अशी सूचना दक्षिण आफ्रिकेनं सीरमला केली आहे.
सीरमनं फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत कोरोना लसीचे १० लाख डोस पाठवले होते. मात्र आता दक्षिण आफ्रिकेनं सीरमची लस न वापरण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त द इकॉनॉमिक टाईम्सनं दिलं आहे. लसींच्या उत्पादनांच्या बाबतीत सीरम जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. सीरमनं ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेकाच्या मदतीनं कोरोनावरील लस तयार केली आहे. विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनंदेखील सीरमच्या लसीच्या वापरास हिरवा कंदिल दिला आहे.