सिंगापूर : सिंगापूर ओपनच्या स्पर्धेतून भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात विजय मिळवत विजेतेपद पटकावले आहे.
यावेळी तिने विरोधी चिनी संघाची खेळाडू झी ई वांग हिचा २१-९, ११-२१, २१-१५ असा पराभव केला आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.
सिंगापूर ओपन २०२२ ही स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. रविवारी (१७ जुलै) झालेल्या या स्पर्धेतील बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चिनी संघाची खेळाडू झी ई वांग हिचा पराभव करत पीव्ही सिंधू हीने आपल्या कारकिर्दीतील पहिले सिंगापूर ओपनचे विजेतेपद पटकावले आहे.
दोन वेळेची या ऑलम्पिक विजेती असलेली पीव्ही सिंधू सिंधूचे हे या हंगामातील तिसरे विजेतेपद ठरले आहे. याआधी तिने दोन सुपर ३००च्या स्पर्धा जिंकल्या आहेत. सिंधूने सयेद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि स्वित्झर्लंडच्या योनक्स स्विस ओपन अशी दोन सुपर ३०० टायटल जिंकली आहेत.
या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम सर्व्ह वांगने केला. सुरूवातील दोघीही बरोबरीत खेळत होत्या. नंतर सिंधूने सलग तीन पॉइंट्स जिंकत पहिला सेट ५-२ असा केला. यामध्ये तिने आपली आगेकुच कायम ठेवत पहिला सेट २१-९ असा सहज जिंकला आहे. दुसऱ्या सेटमध्ये वांग ही काहीशी आत्मविश्वासाने खेळताना दिसली. ती ०-५ अशी पुढे राहीली असताना सिंधूने पुन्हा एकदा मुसंडी मारत सेट २-६ असा केला. मात्र या सेटमध्ये चायनीज खेळाडू खूपच प्रभावी खेळताना दिसली. तिने मारलेले अनेक शॉट्स अप्रतिम होते. याला प्रत्युत्तर करताना भारताच्या स्मॅशिंगक्वीनला सोपे जात नव्हते. हा सेट चीनी खेळाडूने ११-२१ असा जिंकला.
दोघींनी एक-एक सेट जिंकल्याने तिसरा सेट चुरशीचा होणार होता, आणि झालाही तसाच. तिसऱ्या सेटमध्ये वांगने काहीशी आघाडी घेतली होती. मात्र सिंधूने हार न मानता जबरदस्त स्मॅश करत लॉग रॅलीमध्ये बाजी मारली. सेट ६-५ असा झाला असता नंतरही सिंधूने ताबडतोब २ पॉइंट्स मिळवले. यावेळी दोघीही उत्तम शॉट्स मारताना दिसल्या. सेट १८-१४ असा असताना चिनी खेळाडू हार मानायला तयार नव्हती, मात्र तिने केलेल्या चुकीमुळे सिंधूला फायदा झाला. हा सेट भारताच्या स्टार बॅडमिंटमपटूने २१-१५ असा जिंकत आपल्या कारकिर्दीमध्ये आणखी एका विजेतेपदाची भर घातली आहे.