नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पीओ यांनी पाकिस्तानबाबत दावा केला आहे. या दाव्यानं संपूर्ण जगभरात खळबळ माजली आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
फेब्रुवारी 2019 मध्ये बालाकोटमध्ये भारतानं सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याच्या तयारीत होता, असा दावा अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पीओ यांनी केला असल्याचं वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
माजी परराष्ट्र मंत्री माईक पोम्पीओ यांनी त्यांच्या ‘नेव्हर गिव्ह एन इंच : फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह’ या पुस्तकात यासंदर्भात माहिती दिली आहे. माईक यांनी पुस्तकात म्हटलंय की, फेब्रुवारीमध्ये भारतानं बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला. पाकिस्तानाच्या हद्दीत जाऊन भारतीय सैन्यानं दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली होती. माईक यांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तान भारतावर अणुहल्ला करणार असल्याची माहिती त्यांना तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली होती. त्यांनी सांगितलं की, 27-28 फेब्रुवारी 2019 मध्ये ही घटना घडली. तेव्हा ते अमेरिका-उत्तर कोरिया शिखर परिषदेसाठी हनोईला गेले होते. यानंतर त्यांच्या टीमनं नवी दिल्ली आणि इस्लामाबादशी चर्चा केली होती.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पीओ म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध अण्वस्त्र हल्ल्यापर्यंत येऊन पोहोचल्याच्या माहितीपासून जग पूर्णतः अनभिज्ञ होतं. मला नाही वाटत की, कोणालाही याबाबत काहीही माहित होतं. दरम्यान, फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. याच पार्श्वभूमीवर भारताने बालाकोट सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली होती.
माईक पॉम्पीओ म्हणाले की, ते हनोई, व्हिएतनाममध्ये असतानाची ती रात्र कधीही विसरणार नाहीत. त्यांनी सांगितलं की, मी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी पाकिस्तानच्या आण्विक हल्ल्याबाबत बोललो. पॉम्पीओ यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना भारताकडून देण्यात आलेला संदेश दिला. परंतु, त्यावेळी बाजवा यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम देत आमचा असा कोणताही हेतू नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच, तुमच्यापर्यंत पोहोचलेली माहिती चुकीची असल्याचं सांगितल्याचंही माईक यांनी सांगितलं आहे.
पॉम्पीओ यांच्या दाव्यावर परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतीही माहिती अथवा प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आम्ही जे केलं ते कोणताही देश करू शकत नाही, असा दावा माईक पॉम्पीओ यांनी केला आहे.
दरम्यान, भारतानं पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी 29 सप्टेंबर रोजी सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. एलओसी पार करुन भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे 7 तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये अनेक दहशतवाद्यांना खात्मा झाला. 29 सप्टेंबरच्या पहाटे भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांच्या तळांवर हल्ला केला.