शिरवळ : पार्टी साठी गेलेल्या टोळक्यातील एकाने दारूच्या नशेत रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. ही घटना तोंडले (ता. खंडाळा) तालुक्यातील वीर धरण परिसरात घडली. गोळीबार करणार्या टोळक्याला शिरवळ पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी किरण देविदास निगडे (४६, रा. गुळूंचे ता. पुरंदर. जि. पुणे), सूर्यकांत चंद्रकांत साळूंखे (२८, रा. कानिफनाथवस्ती, भादे ता.खंडाळा), नवनाथ बबन गाडे (३४, रा. चोपडज, पोस्ट करंजे ता. बारामती. जि. पुणे), माधव अरविंद जगताप (३२, रा. वाकी पोस्ट करंजे ता. बारामती. जि. पुणे), तात्याराम अर्जुन बनसोडे (३८, रा. अंथुर्णे ता. इंदापूर जि. जि. पुणे), विजय ज्ञानदेव साळुंखे (३९, रा. चोपडज(सोमेश्वर) पोस्ट करंजे ता. बारामती. जि. पुणे), योगेश प्रकाश रणवरे (४२, रा. राख ता. पुरंदर. जि. पुणे), वसंत नामदेव पवार (४७, रा. कोळविहीरे, ता. पुरंदर. जि. पुणे),अरविंद धनशाम बोदेले (४१, रा. लवथळेश्वर,जेजूरी ता. पुरंदर. जि. पुणे, मूळ रा. भिवापूर जि. नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
गोळीबार प्रकरणी पोलिसांनी किरण निगडे याच्या मालकीची शासकीय परवान्याची मुदत संपलेली रिव्हॉल्हर, दोन कार, मोबाईल आदी मुद्देमाल जप्त केला आहे. किरण निगडे आणि त्याचा मित्र योगेश रणवरे यांनी हवेत गोळीबार करत परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे करीत आहेत.