वाळू माफियांसोबतची ‘पार्टी’; तीन पोलीस निलंबीत

0

भंडारा : वाळू माफियांसोबत मटणाची पार्टी करणं भंडारा पोलीस दलातील तीन पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. वाळू माफियांसोबत मटणाची पार्टी करणाऱ्या तीन पोलीस शिपायांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. दिलीप धावडे, खुशांत कोचे, राजेंद्र लांबट असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस शिपायांची नावे आहेत. पोलिसांच्या निलंबनाचे आदेश पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी काढले आहेत.

भंडाऱ्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना वाळू माफियांकडून मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून सहा आरोपी फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींसोबत मटणाची पार्टी करणाऱ्या तीन पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आले आहे.

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील बेटाडा गावामध्ये 27 एप्रिल रोजी वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी उप विभागीय अधिकाऱ्यांचे पथक गेले होते. त्यावेळी या पथकावर वाळू माफियांनी हल्ला करुन उप विभागीय अधिकारी रवींद्र राठोड आणि पोलीस उपनिरीक्षक राऊत यांना जखमी केले होते. याप्रकरणी पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन 9 पैकी तीन आरोपींना अटक केली आहे.

उप विभागीय अधिकारी यांच्या पथकावर हल्ला करणारे आरोपी नागपूर जिल्ह्यातील  उमरेड तालुक्यातील दि मर्शी हॉटेलमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक हॉटेलमध्ये पोहचले. त्यावेळी आरोपी मटणाची पार्टी करत होते. आरोपींना अटक करण्यासाठी गेलेले पोलिसच आरोपींसोबत मटण पार्टीमध्ये सहभागी झाले. यावेळी पोलीस वर्दीवर होते. वाळू माफियांसोबत मटण पार्टी करतानाचा पोलिसांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यानंतर पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत पार्टीत सहभागी झालेल्या तीन पोलीस शिपायांना निलंबित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.