नवी दिल्ली : प्रत्येकाला आपण दीर्घायुषी व्हावं, असं वाटत असतं. भारतात पुरुषांचं सरासरी आयुष्य हे 69.5 वर्ष तर महिलांचं सरासरी आयुष्य 72.2 वर्षांचं आहे.
हृदयरोग, फुफ्फुसांशी संबंधित आजार, स्ट्रोक, मधुमेह यासारखे जवळपास 50 मुख्य आजार हे बहुतांश भारतीयांच्या मृत्यूचं कारण ठरतात. नव्याने समोर आलेल्या संशोधनानुसार आपण खात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा संबंध आपल्या दीर्घायुषी किंवा अल्पायुषी होण्याशी असतो. प्रत्येक चांगला पदार्थ आपलं आयुष्य काही मिनिटांनी वाढवत असतो, तर प्रत्येक वाईट पदार्थ आपलं आयुष्य काही मिनिटांनी कमी करत असतो. त्यामुळे आरोग्यपूर्ण, पौष्टिक आहार घेणाऱ्या व्यक्ती या अधिक सुदृढ होतात आणि दीर्घकाळ जगत असल्याचं दिसून येतं.
‘द टेलिग्राफ’नं दिलेल्या वृत्तानुसार मिशिगन विद्यापीठात याबाबत एक संशोधन करण्यात आलं. अभ्यासकांनी केेलेल्या दाव्यानुसार काही पदार्थ खाल्ल्याने लोकांचं आयुष्य वाढत असल्याचं दिसलं, तर काही पदार्थांमुळे ते कमी होत असल्याचं दिसून आलं. उदाहरणार्थ जर कुणी शेंगदाणे खात असेल, तर त्याचं आयुष्य हे 26 मिनिटांनी वाढू शकतं, तर कुणी ‘हॉट डॉग’ खात असेल, तर त्याचं आयुष्य प्रत्येकवेळी 36 मिनिटांनी कमी होतं.
नेचर फूड जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात सुमारे 6 हजार पदार्थांच्या बाबतीत हे संशोधन करण्यात आलं आहे. नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण अशा वेगवेगळ्या वेळेत खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांच्या बाबतीत हे संशोधन करण्यात आलं असून त्यातील काही निवडक आणि नेहमी खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांचे काय परिणाम होतात, हे पाहूया.
आयुष्य कमी करणारे पदार्थ
हॉट डॉग – आयुष्यातील 36 मिनिटं होतात कमी
प्रोसेस्ड मीट – आयुष्यातील 26 मिनिटं होतात कमी
चीज बर्गर – आयुष्यातील 8.8 मिनिटं होतात कमी
सॉफ्ट ड्रिंक – आयुष्यातील 12.4 मिनिटं होतात कमी
पिझ्झा – आयुष्यातील 7.8 मिनिटं होतात कमी
हे पदार्थ खाण्यामुळे वाढतं आयुष्य
पीनट बटर आणि जॅम सँडविच – आयुष्य 33.1 मिनिटांनी वाढतं
बेक्ड सेल्मन मासे – आयुष्य 13.5 मिनिटांनी वाढतं
केळ – आयुष्य 13.5 मिनिटांनी वाढतं
टोमॅटो – आयुष्य 3.8 मिनिटांनी वाढतं
अवोकाडो – आयुष्य 1.5 मिनिटांनी वाढतं
वेगवेगळ्या पदार्थांचा शरीरावर आणि पर्यावरणावर काय परिणाम होतो, ते पाहण्यासाठी हे संशोधन करण्यात आलं होतं. सर्वसामान्य माणसांना या संशोधनात समोर आलेल्या निष्कर्षांनुसार आपल्या आहारात कुठल्या पदार्थांचा समावेश करावा आणि कुठले पदार्थ वगळावेत, याचा फैसला करता येणार आहे.
डिस्क्लेमर – संशोधनातून समोर आलेले हे निष्कर्ष आहेत. तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही गंभीर समस्या असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे.